लॅपटॉप, मोबाईल्स, कॅमेरांचा समावेश : दोघे आंतरराज्य चोरटेही गजाआड : पेडणे पोलिसांची यशस्वी कारवाई
प्रतिनिधी / पेडणे
गेल्या दोन महिन्यांपासून आश्वे, मोरजी, मांदे आणि हरमल या भागातील विविध ठिकाणांहून मोठय़ा प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पेडणे पोलीस स्थानकात त्याबाबत तक्रारीही नोंद झाल्या आहेत. या प्रकरणांचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या तपासा दरम्यान संशयित लतीफ खान (28) म्हैसूर कर्नाटक, व के. एस. अजीज के सदू (46) कोडंगू, कर्नाटक या दोन युवकांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पेडणे पोलिसांच्या या यशस्वी कारवाईबद्दल त्यांचे शहरात अभिनंदन होत आहे.
या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी
हे दोन्ही संशयित पर्यटकांना टार्गेट करून प्रामुख्याने त्यांच्या लॅपटॉपसारख्या मौल्यवान वस्तूंची चोरी करत होते. कॅमेरा, मोबाईल फोन, रोख रकमेचीही चोरी करायचे, अशी माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. अशाप्रकारच्या चोऱयांची प्रकरणे वाढू लागल्याने पेडणे पोलिसांनी या चोरटय़ांन पकडण्यासाठी धडक मोहीम राबवली, परंतु संशयित वारंवार आपली ठिकाणे बदलत असत.
दोन्ही चोरटे आंतरराज्य रेकेटचे
पेडणे पोलिसांना तपासादरम्यान हे संशयित केरळ आणि कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कर्नाटक आणि केरळ पोलिसांच्या मदतीने अशा आंतरराज्य कारवाईत अनेक चोरांच्या गुह्यांमध्ये सामील असलेल्या आंतरराज्य घरफोडी रॅकेटचा पर्दाफाश करून संशयितांना अटक करण्यात आली.
तब्बल 25 लाखांचा माल जप्त
या आंतरराज्य कारवाई दरम्यान पेडणे पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात विविध ब्रँडचे तेरा लॅपटॉप, विविध ब्रँडचे 15 मोबाईल फोन, दोन लॅपटॉप कॅमेरे अशा वस्तू मिळून सुमारे 25 लाखांच्या ऐवजाचा समावेश आहे. संशयिताकडून जप्त केलेल्या वस्तू कुठून चोरी केल्या, याचा शोध पेडणे पोलीस घेत आहेत.
पोलिस अधीक्षक सक्सेना व पेडणे पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सुमेधा नाईक, कॉन्स्टेबल राजेश एसी, सागर खोर्जुवेकर, प्रज्योत मयेकर, विशाल नाईक, परब यांच्या पथकाने ही कारवाई केली.