Tarun Bharat

250 रुपयांचा वाद बेतला जीवावर

Advertisements

बियर बाटलीने डोक्यात वार करून युवकाचा खून : तरुणाला अटक

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शहर व तालुक्यात खुनांची मालिका सुरूच आहे. केवळ 250 रुपयांसाठी बियर बाटलीने हल्ला करून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री सत्यसाई कॉलनी, वैभवनगर, जनता प्लॉट परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी त्याच परिसरातील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

महम्मद दिलपुकार शेख (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारू आणण्यासाठी दिलेल्या पैशांवरून त्याच्या मित्राबरोबर झालेल्या वादावादीनंतर खुनाचा हा प्रकार घडला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी उस्मान लालसाब शेख (वय 25) (रा. सत्यसाई कॉलनी, वैभवनगर, जनता प्लॉट) याला अटक केली आहे. त्याच्यावर भादंवि 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

रविवारी उत्तरीय तपासणी करून महम्मदचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. केवळ 250 रुपयांसाठी खुनाचा हा प्रकार घडला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महम्मदने उस्मान शेखकडे दारू आणण्यासाठी 500 रु. दिले होते. यामधून उस्मानने अडीचशे रुपयांची दारू आणली.

दारू खरेदी करून उरलेले अडीचशे रुपये उस्मानकडे परत मागितले. त्याने उरलेले पैसे देण्यास नकार दिल्यामुळे या दोघा जणांमध्ये भांडण जुंपले. भांडण विकोपाला गेले. उस्मानने एका बियर बाटलीने महम्मदच्या डोक्यावर हल्ला केला.त्याला नागरिकांनी तातडीने खासगी इस्पितळात हलविले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सत्यसाई कॉलनीजवळील समीर सय्यद यांच्या घराजवळ ही घटना घडली आहे. यावेळी झालेल्या झटापटीनंतर पडून उस्मानही जखमी झाला होता. त्याच्यावर रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. रविवारी उस्मानला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Related Stories

टिळकवाडीतील रस्त्याला आले कचरा डेपोचे स्वरुप

Amit Kulkarni

• थर्टीफस्टला तळीरामांनी रिचवले 1 लाख 87 हजार लीटर मद्य

Patil_p

कणबर्गी सिद्धेश्वरनगरमधील सीडी कोसळण्याच्या मार्गावर

Amit Kulkarni

कार्तिक पौर्णिमेनिमित्त लक्ष दीपोत्सव

Patil_p

बेळगावातील 305 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

शहापूर येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Amit Kulkarni
error: Content is protected !!