पुणे / प्रतिनिधी :
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आहे. शिंदे गट आणि भाजपच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. आता दुसऱया मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी केली असल्याचे रासप नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले. पंकजा मुंडे भाजप सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रासप नेते महादेव जानकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. जानकर म्हणाले, आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचे की नाही, हा निर्णय त्यांच्या न्यायालयात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावे की घेऊ नये, हे भाजपने ठरवावे.
अधिक वाचा : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल
पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत
पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहणार. त्यांच्या वडिलांचे आयुष्य भाजपमध्ये गेले. त्यांचेही गेले आहे. त्या कुठे जाणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीसांच्या कामाचे कौतुक
शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. राज्यात चांगली कामे होत आहेत, अशा शब्दांत जानकर यांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले.