ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
युरोपात स्टील्थ ऑमिक्रॉन हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे नवे रूप सापडले आहे. ओमिक्रॉनचे हे नवे रुप आरटी-पीसीआर चाचणीतही आढळून येत नसल्याचे ब्रिटनच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत युरोपात कोरोनाच्या नव्या लाटेचा धोकाही निर्माण झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये बीए.1, बीए.2 आणि बीए.3 असे तीन सबस्ट्रेन आहेत. जगभरात नोंदवल्या गेलेल्या ओमिक्रॉनच्या संसर्गांमध्ये बीए.1 हा स्ट्रेन प्रबळ असला, तरी बीए.2 स्ट्रेन वेगाने पसरत आहे. बीए.2 स्ट्रेनलाच सामान्यपणे स्टील्थ ओमिक्रॉन म्हटले जाते. संशोधकाच्या मते, बीए.1 ची लागण झाल्यानंतर आपल्याला बीए.2 चा देखील संसर्ग होऊ शकतो. तसेच हा स्ट्रेन आरटी-पीसीआर चाचणीमधूनही सुटू शकतो. त्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये याची जोरदार लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे.
भारतासह डेन्मार्क, ब्रिटन, स्वीडन आणि सिंगापूरसह 40 देशात स्टील्थ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. डेन्मार्कने 20 जानेवारी 2022 रोजी अहवाल दिला की, बीए.2 सबस्ट्रेन देशातील सक्रिय प्रकरणांपैकी निम्म्यासाठी जबाबदार आहे.