पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतून 77 हजार 780 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही 24 हजार 126 जागा रिक्त असून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना 13 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. यंदा राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही 24 हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 13 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिक संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण, राष्ट्रवादीची भूमिका