नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ईपीएफओच्या कोटय़वधी सदस्यांचा डेटा लीक झाल्याची अफवा पसरल्याने कामगारवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ईपीएफओच्या या डेटामध्ये सर्व कर्मचाऱयांचे बँक खाते क्रमांक, त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींचे खाते क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहितीदेखील आहे. युपेनमधील एका संशोधकाने डेटा लीक झाल्याची माहिती सार्वजनिक केली आहे. सद्यस्थितीत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, कामगार मंत्रालयाने याची पुष्टी केली नसली तरी नकारही दिलेला नाही.
सध्याचे ईपीएफओ सदस्य आणि पेन्शनधारकांसह एकूण संख्या सुमारे सव्वासात कोटी असली तरी त्यांचे नॉमिनी जोडले तर ही संख्या दुप्पट होते. याशिवाय दर महिन्याला सुमारे दहा लाख सदस्य नव्याने जोडले जातात. याचदरम्यान अनेक सदस्य बाहेरही पडत असतात. या सदस्यांचा डाटा पूर्णपणे संरक्षित केलेला असून तो लीक करणे अवघड असते. तरीही डेटा लीक झाल्याच्या वृत्ताने कामगारांची चिंता वाढली आहे.