सर्वत्र कौतुकांचा वर्षाव; अँथलेटिक्स मध्ये सुवर्णसह कास्यपदकाची मानकरी
देशमुखनगर :वार्ताहर, धनाजी कणसे
सातारा तालुक्यातील वर्णे येथील धावपटू अनुष्का कुंभार हिने कुवेतमधील एशियन अँथलेटिक्स स्पर्धेत गगनाला गवसणी घातली. तिने मिडले रिले या स्पर्धेत सुवर्ण व ४०० मीटर वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले आहे.तीच्या या दैदीप्यमान सुवर्ण दौडमुळे साताऱ्याचा झेंडा समुद्रापार फडकविला आहे.
ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य कुटुंबातील अनुष्काने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले आहे. वर्णे गावचे माजी सरपंच दत्तात्रय कुंभार यांची ही कन्या. स्वतःतील नैसर्गिक कोैशल्याला मेहनतीची जोड देत, तिचे अँथलेटिक्स मध्ये सातत्यपूर्ण कामगीरी सुरू आहे. अनुष्का यावर्षी आँगस्टमध्ये पार पडलेल्या केली-कोलंबिया येथील जागतिक ज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाली होती. तीची एकाच वर्षातील ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.केवळ १७ वर्षीय अनुष्काने अनेक अडचणीवर मात करीत आँलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने घौडदौड सुरू केली आहे.
कुवेत येथे युथ एशियन अँथलेटिक्स चाँम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत आशिया खंडातील ३३ देशातील ४०० खेळाडू सहभागी झाले होते.या स्पर्धेत चार बाय ३००मीटर (मिडले रिले) धावण्याच्या स्पर्धेत तिने भारतीय संघासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. याच स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात तिने कांस्य पदक पटकाविले आहे. अनुष्काने यापूर्वी भोपाळ (मध्य प्रदेश) येथे आयोजित राज्य मैदानी स्पर्धेतही यश संपादन केले होते.तीची ही सुवर्ण घौडदौड सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.तीच्या उज्ज्वल यशाबद्दल संपूर्ण सातारा जिल्ह्यासह वर्णे पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तीचे ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी व्हायचे स्वप्न बाळगून अनुष्काचा प्रवास सध्या सुरु आहे.
वडीलही नामांकित मल्ल
तिचे वडिलही नामांकित कुस्ती मल्ल होते. अनुष्काची आई सत्यभामा या गृहिणी आहेत. ईश्वरी व स्वरा या दोन्ही बहिणीही अनुष्काच्या पावलावर पाऊल ठेवून खेळात चमकण्याची आस बाळगून आहेत.
वर्णेत २०आक्टोबर रोजी भव्य नागरी सत्कार
आंतरराष्ट्रीय धावपटू व सुवर्ण पदक विजेती अनुष्का कुंभार हिचा २० आक्टोबर रोजी वर्णे ता सातारा येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात येणार आहे