वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल महिला धावपटू 36 वर्षीय सुधा सिंगने स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक क्षेत्रातून निवृत्ती घोषित केली. आपल्या 13 वर्षांच्या ऍथलेटिक कारकीर्दीला निरोप देण्याचा निर्णय तिने जाहीर केला.
उत्तरप्रदेशमधील अमेथी येथे जन्मलेल्या सुधा सिंगने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर आणखी काही दिवस ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून लवकरच अकादमी उघडण्याची योजना आखली आहे. 2007 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुधा सिंगने 3000 मी. स्टिपल चेसमध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळविले होते. तसेच तिने या क्रीडा प्रकारात जमशेदपूरमध्ये झालेल्या एका स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात सुधा सिंग हिने विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. 2009 साली झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने या क्रीडा प्रकारात आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक (रौप्य) मिळविले होते. 2010 साली चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. या क्रीडा प्रकारात सुधासिंगने चीनच्या युआनला मागे टाकत 9 मिनिटे, 55. 67 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले होते. 2011 च्या आशियाई स्पर्धेत सुधा सिंगने दुसरे रौप्यपदक मिळविले होते. 2012 साली तिने राष्ट्रीय विक्रम करत लंडन ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्धता केली होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुधा सिंगने आपली पात्रता सिद्ध केली होती. मात्र 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिला आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. 19 नोव्हेंबर रोजी प्रयागराज येथे होणाऱया इंदिरा मॅरेथॉनमध्ये सुधा सिंग सहभागी होणार आहे. तसेच तिने रायबरेली किंवा अमेथी येथे ऍथलेटिक्स अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.