82.32 पर्यंत अवमूल्यन; विक्रमी पातळीवर घसरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. शुक्रवारी रुपया 44 पैशांच्या घसरणीसह 82.32 या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. एकीकडे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ झाल्याने डॉलर मजबूत होत आहे. दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे गुंतवणूकदारांची डॉलरकडे ओढ वाढल्यामुळे सर्व चलनांच्या तुलनेत डॉलरची किंमत सातत्याने वाढत आहे. भारतीय चलन गेल्या एका आठवडय़ात 1 रुपयाने, एका महिन्यात 2.5 रुपयांनी आणि यावषी आतापर्यंत 8 रुपयांनी म्हणजे 10 टक्क्यांनी घसरले आहे. दिवसेंदिवस रुपयाची घसरण सुरू असल्यामुळे वस्तूंची आयात भारतासाठी आणखी महाग होऊ शकते. याशिवाय अमेरिकेत जाणे आणि शिक्षण घेणेही महागडे ठरणार आहे. शैक्षणिक शुल्कापासून ते राहण्या-खाण्यापर्यंत आणि इतर गोष्टी महागणार आहेत. एकंदर रुपयाच्या होणाऱया अवमूल्यनामुळे बाजारपेठेत आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुपयाच्या अवमूल्यनाची अनेक कारणे समोर येत असली, तरी त्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींचा मुख्य परिणाम दिसून येत आहे. याशिवाय, अमेरिकी बॉण्डचे दर, गुंतवणूकदारांमधील निरुत्साह हे घटकही कारणीभूत आहेत. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81.89 वर बंद झाला होता. तो 27 पैशांनी कमजोर होऊन 82.16 वर उघडला. दिवसभराच्या कामकाजात त्यात आणखी घसरण झाली. रुपयाची 52 आठवडय़ांची श्रेणी 73.77-82.32 अशी आहे. स्थूल आर्थिक चिंता आणि फेडने केलेली व्याजदरवाढ यामुळे भारतीय रुपया यावषी सुमारे 10.7 टक्क्यांनी घसरला आहे. यूएस मध्यवर्ती बँकेने अलीकडेच सलग तिसऱयांदा व्याजदर वाढवले आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवून 3-3.25 टक्के केले आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
आरबीआयकडून कठोर निर्णय शक्य
रुपयाची किंमत 82 च्या खाली घसरल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक कठोर पावले उचलण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेची कारवाई मर्यादित असली तरी रुपयाला आणखी घसरण होण्यापासून वाचवले जाईल, असा तज्ञांचा अंदाज आहे. आरबीआयच्या उपाययोजनांमुळे नजिकच्या काळात रुपया अधिक मजबूत होण्याचे संकेत नसले तरी घसरण रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
सेवा क्षेत्राच्या मागणीवर जागतिक मंदीचा परिणाम
सप्टेंबरमध्ये भारताच्या सेवा क्षेत्रातील वाढ सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिली. वाढत्या महागाईमुळे मागणीत घट झाली असून त्यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. 10 वर्षांच्या अमेरिकन बॉण्ड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे डॉलर देखील मजबूत झाला आहे. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनी पुढील वषी मंदीत जाऊ शकते, ज्यामुळे युरोची घसरण होऊ शकते. वाढत्या ऊर्जा संकटामुळे आणि पुरवठा समस्यांमुळे मंदीची शक्मयता बळकट होत आहे.