युक्रेनचा दावा ः डोनेस्ट्कमध्ये रशियाचे हल्ले तीव्र
रशिया-युक्रेन युद्धाला 2 महिने झाले असून दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. याचदरम्यान रशियाने बेलगोरोडनजीक इस्कंदर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाची ही यंत्रणा कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्त आहे.
रशिया याच क्षेपणास्त्र यंत्रणेद्वारे युक्रेनवर आण्विक हल्ला करू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र 480 ते 700 किलोग्रॅम वजानपर्यंतचे आण्विक आणि बिगरआण्विक अस्त्र वाहून नेऊ शकते. रशियाचे सैनिक डोनेस्ट्कच्या दिशेने हल्ले करत आहेत. क्षेपणास्त्र, रॉकेट, मोर्टारद्वारे त्यांच्याकडून हल्ले सुरू असल्याचे युक्रेनच्या सैन्याकडून सांगण्यात आले.
युक्रेनने खेरसॉनमधील एक रशियन कमांड पोस्ट नष्ट केली आहे. रशियन पोस्टवरील हल्ल्यावेळी दोन मोठे रशियन अधिकारी तेथे उपस्थित होते, परंतु ते मारले गेल्याची पुष्टी मिळाली नसल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. तर युक्रेनच्या खारकीव्हमध्ये एक एसयू-25 लढाऊ विमान पाडविल्याचा आणि तीन एमआय-8 हेलिकॉप्टर नष्ट केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
इस्तंबुलमधील चर्चा ब्लादिमीर पुतीन यांच्यावर निर्भर आहे. युक्रेन शांतता चर्चेसाठी पूर्णपणे तयार असला तरीही आम्ही कुठल्याच अटी मान्य करणार नाही. पूर्ण घडामोडींवर आम्ही नजर ठेवून आहोत असे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत.
रशियासाठी तुर्कस्तानची हवाईबद्द बंद
रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा करविण्याच्या दाव्यादरम्यान तुर्कस्तानने मोठी कारवाई केली आहे. तुर्कस्तानचे हवाईक्षेत्र रशियासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विदेशमंत्र्यांनी दिली आहे. रशियाची विमाने आता सीरियासाठी तुर्कस्तानच्या हवाईक्षेत्रातून उड्डाण करू शकणार नाहीत असे ते म्हणाले. तर यापूर्वी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 48 तासांमध्ये संपणार असल्याचा दावा केला होता. इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांच्या अध्यक्षांदरम्यान चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
ओडेशामध्ये क्षेपणास्त्र हल्ला
युक्रेनच्या ओडेशामध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाने नागरी वस्तीवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून आम्ही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत असे ओडेशाच्या महापौरांनी म्हटले आहे.
मारियुपोलमधील बचावकार्य
रशियाच्या हल्ल्यानंतर आम्ही मारियुपोलमधून 1 लाख लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करत आहोत. मारियुपोलच्या अनेक हिस्स्यांवर रशियाने कब्जा केला असल्याचे युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी म्हटले आहे.