20 जणांचा मृत्यू ः इमारत कोसळल्याने 73 जखमी
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या दिशेने 33 क्षेपणास्त्रs डागली आहेत. युक्रेनच्या निप्रो शहरात 9 मजली इमारतीवर क्षेपणास्त्रs कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला तर 73 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 15 वर्षीय मुलीचा समावेश असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो टिमोशेंको यांनी सांगितले. हल्ल्यानंतर बचाव पथकाने इमारतीतून 37 जणांना बाहेर काढले आहे.
रशियाने डागलेल्या 33 क्षेपणास्त्रांपैकी 21 क्षेपणास्त्रांना आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केला आहे. रशियाने युक्रेनच्या पॉवर ग्रिडवर हल्ला केल्याने देशाच्या मोठय़ा भूभागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. रुग्णालये आणि नागरी इमारतींमधील वीजपुरवठा ठप्प झाला असून बहुतांश भागांमध्ये इमर्जन्सी ब्लॅकआउट लागू असल्याची माहिती युक्रेनचे ऊर्जामंत्री जर्मन गालुशचेंको यांनी दिली आहे.
रशियाने 29 डिसेंबर रोजी युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला करत सागरातून तसेच आकाशातून 120 क्षेपणास्त्रs डागली होती. राजधानी कीव्ह समवेत 7 शहरांवर हल्ले करण्यात आले होते. तत्पूर्वी 15 नोव्हेंबर रोजी रशियाने युक्रेनवर 100 क्षेपणास्त्रs डागली होती. यातील दोन क्षेपणास्त्रs पोलंडमध्ये कोसळली होती.
कीव्हमध्ये निदर्शने
कीव्हमध्ये युक्रेनच्या जनतेने रशियाच्या कब्जातील युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांच्या सुटकेसाठी निदर्शने केली आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत रशियाने युक्रेनचे अनेक सैनिक आणि नागरिकांना स्वतःच्या कैदेत ठेवले असून यात अनेक मुलांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. युक्रेन सातत्याने स्वतःच्या नागरिकांच्या सुटकेची मागणी करत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये देखील युक्रेनवरील हवाई हल्ल्यांच्या विरोधात निदर्शने झाली आहेत.
ब्रिटन पुरविणार रणगाडे
रशियाचा सामना करण्यासाठी ब्रिटन युक्रेनला रणगाडे पुरविणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनच्या अध्यक्षांशी फोनवरून संवाद साधत ही माहिती दिली आहे. युरोपचा एखादा देश युक्रेनला अत्यंत घातक शस्त्रास्त्र देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. ब्रिटिश चॅलेंजर 2 रणगाडा युक्रेनच्या सैन्याला मिळणार आहे.