केवळ पारंपरिक शस्त्रांनी लढू : युक्रेन संकटासाठी अमेरिका जबाबदार
रशिया-युक्रेन युद्धाला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ झाला असला तरीही दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की आणि अमेरिकेने रशियाकडून आण्विक हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे.
रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एका मुलाखतीत अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता धुडकावून लावली आहे. रशिया युक्रेनच्या विरोधात केवळ पारंपरिक अस्त्रांचाच वापर करणार, अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे लावरोव्ह म्हणाले.
युक्रेनमध्ये सध्या जे काही घडतेय त्यामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांची पूर्ण जगावर राज्य करण्याची मानसिकता कारणीभूत आहे. हे सर्व देश मिळून युक्रेनला चिथावणी देत आहेत. याच देशांनी युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांचा मोठा भांडार उभा केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
1992 मध्ये सोव्हियत महासंघाच्या पतनानंतर अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांनी रशियाच्या दिशेने नाटोचा विस्तार करणार नसल्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांनी स्वतःचा शब्द मोडला आहे. पाश्चिमात्य देश नेहमीच युक्रेनला रशियाच्या विरोधात चिथावणी देत राहिले असल्याचे विधान लावरोव्ह यांनी केले आहे.
युद्ध नव्हे केवळ विशेष मोहीम
काही काळापूर्वी भारताच्या अधिकृत दौऱयादरम्यान सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनमध्ये युद्धच सुरू नसल्याचा दावा केला होता. युक्रेनमध्ये युद्ध सुरू नसून केवळ एक विशेष मोहीम राबविली जात आहे, यात युक्रेनच्या सैन्य सुविधांना लक्ष्य करण्यात येत आहे. आगामी काळात कीव्हमधील सरकार रशियासाठी धोकादायक ठरू नये केवळ हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले होते.