युद्धाला 90 दिवस पूर्ण : युरोपीय महासंघ करणार युक्रेनला मोठी मदत
वृत्तसंस्था / कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धाला 90 दिवसांहून अधिक काळ झाला असला तरीही दोन्ही देशांदरम्यान कुठलाच तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. याचदरम्यान रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या सेवेरोडोनेट्स्क आणि डोनेट्स्क शहरांवर कब्जा केला आहे. यासंबंधीची माहिती तेथील गव्हर्नर पावलो क्यारिलेंको यांनी रेडिओच्या माध्यमातून दिली आहे.
यापूर्वी रशियाचे समर्थनप्राप्त डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिकने टेलिग्रामवर एक पोस्ट करत आपल्या सैनिकांनी शहरावर कब्जा केला असून युक्रेनचा ध्वज हटवून तेथे रशियन ध्वज फडकविल्याचे म्हटले होते.
तर दुसरीकडे युरोपीय महासंघाने युद्धात युपेनचा विजय सुनिश्चित होण्यासाठी शक्य ते सर्व काही करणार असल्याचे नमूद केले आहे. हा युक्रेनच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, तसेच हा केवळ युरोपपुरता मुद्दा नाही. तर पूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाकरता महत्त्वाचा विषय आहे. युक्रेनमधील रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर दिले जायला हवे आणि युक्रेनने हे युद्ध जिंकावे असे उद्गार युरोपीय महासंघाच्या प्रमुख उर्सुला वोन डेर लेयेन यांनी काढले आहेत.
युक्रेन निमित्त, युरोपवरच आक्रमण
युक्रेनच्या निमित्ताने रशिया युरोपीय महासंघावरच थेट हल्ला करत आहे. याप्रकरणी युरोपीय देशांनी एकत्र पुढे येण्याची गरज आहे. स्पेनमध्ये सध्या एक लाखाहून अधिक युक्रेनियन शरणार्थी असल्याचे उद्गार स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी काढले आहेत. बर्लिनमधील भिंत पाडविण्यात आली होती तेव्हा आणि सोव्हियत महासंघाचे पतन झाले तेव्हाही मुलांच्या जीवाला नुकसान पोहाचले नव्हते असे सांचेज यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना म्हटले आहे.
20 देशांकडून मदतीचा हात
सुमारे 20 देशांनी युक्रेनला नवे सुरक्षा सहाय्य पॅकेज देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासंबंधीची माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दिली आहे. सुमारे 48 देश आणि संघटनांनी युक्रेनला मदत करण्यासंबंधी ऑनलाईन बैठक घेतली आहे. बैठकीत 20 देशांनी शस्त्रास्त्रs, तोफा, दारूगोळा, कोस्टल डिफेन्स सिस्टीम आणि रणगाडे तसेच चिलखती वाहने पुरविण्याचे आश्वासन दिल्याचे ऑस्टिन यांनी सांगितले आहे.
डेन्मार्क देणार क्षेपणास्त्र
डेन्मार्कने युक्रेनला हार्पून अँटीशिप मिसाइल सिस्टीम देणार असल्याचे म्हटले आहे. तर चेक प्रजासत्ताकने युक्रेनला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टर, रणगाडे आणि रॉकेट सिस्टीम देण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनने अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याचे रॉकेट, एम270 एमएलआरएस आणि एम142 हिमार्सची मोबाइल बॅटरी मागितली आहे.
पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु ते त्यातून बचावले होते असा दावा युक्रेनचे सैन्याधिकारी मेजरल जनरल कायरलो बुडानोव्ह यांनी केला आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर हत्येचा हा अयशस्वी प्रयत्न काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्रादरम्यान मोडणाऱया कॉकेशस भागात झाला होता असे बुडानोव्ह यांनी म्हटले आहे.