अमेरिकेचे दोन शत्रू आले एकत्र ः तुर्कियेलाही भेट देणार पुतीन
@ वृत्तसंस्था / तेहरान
रशिया आणि इराण या दोन देशांवर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. रशिया आणि इराणने आता परस्परांमधील व्यापारात डॉलरचा वापर हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे इराणच्या दौऱयावर आहेत. इराणच्या स्वतःच्या पाचव्या दौऱयात ते तेथील सर्वोच्च नेते अली खामनेई यांची भेट घेणार आहेत. सद्यकाळात रशिया आणि इराण या दोन्ही देशांचा पाश्चिमात्य देशांसोबत तणाव सुरू आहे.
इराण हजारो ड्रोन्स रशियाला पुरवू पाहत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांनी अलिकडेच म्हटले होते. युक्रेन युद्धामुळे रशियाला ड्रोन्सची कमतरता जाणवत असल्यानेच त्याला इराणकडून मदत मागावी लागली आहे.
इराण दौऱयाचा उद्देश क्षेत्रीय दिग्गजांसोबतचे संबंध दृढ करणे असल्याचे पुतीन यांच्या दौऱयाबद्दल रशियाकडून सांगण्यात आले आहे. अमेरिका आणि युरोपीय देश रशिया विरोधात एकवटले असताना पुतीन इराणचा दौरा करत आहेत. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांच्याशी पुतीन चर्चा करणार आहेत.
युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांदरम्यान पुतीन हे इराणसोबतचे संबंध दृढ करू पाहत आहेत. इराणवरही अमेरिकेचे अनेक निर्बंध आहेत.