भारताने मैत्रीधर्म पाळला ः वोस्तोक युद्धाभ्यासात सामील होण्यास नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियात भारतासह अनेक चीनविरोधी देशांनी हवाई युद्धाभ्यास केला होता. या पार्श्वभूमीवर रशिया आणि चीन आता जपाननजीकच्या समुद्रात वोस्टोक 2022 या नावाने सागरी युद्धाभ्यास करणार आहेत. या युद्धाभ्यासासाठी रशियाने भारताला देखील निमंत्रित पेले होते, परंतु भारताने याला नकार दिला आहे.
रशिया आणि चीनचे नौदल जपाननजीकच्या समुद्रात हा युद्धाभ्यास करणार आहेत. दोन्ही देश या युद्धाभ्यासाद्वारे अमेरिका आणि जपानसोबतच्या तणावादरम्यान शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मानले जात आहे. रशिया आणि चीनची ही रणनीति पाहता भारताने या युद्धाभ्यासात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या युद्धाभ्यासाला जपानने विरा दर्शविला आहे.
युक्रेन युद्ध आणि तैवानमधील तणावादरम्यान रशिया अन् चीन हे काही देशांसोबत मिळून 1-7 सप्टेंबरपर्यंत वोस्टोक 2022 या नावाने सागरी युद्धाभ्यास करणार आहेत. सध्या जपानचा रशिया अन् चीन या दोघांसोबत तणाव सुरू आहे. अशा स्थितीत भारताने घनिष्ठ मित्रदेश जपानसोबतच्या संबंधांची संवेदनशीलता पाहता या युद्धाभ्यासात सामील होण्यास नकार दिला आहे.
जपानने रशियाला हा युद्धाभ्यास आयोजित न करण्याची सूचना केली होती. परंतु रशियाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तर जपानची विनंती मान्य करत भारताने यातून काढता पाय घेतला आहे. या युद्धाभ्यासात रशिया, चीन, सीरिया, ताजिकिस्तान, अझरबैजान, बेलारुस, कजाकस्तान, किर्गिस्तान आणि लाओस हे देश सहभागी होत आहेत.
रशिया आणि चीन हे ज्या भागात हा युद्धाभ्यास करणार आहेत, तो चीनच्या उत्तर सीमेपासून नजीक आहे. या भागाला कुरिल बेटसमूह म्हटले जाते. या बेटावर जपान अन् रशिया दोघेही दावा करतात. दक्षिण कूरिल बेटसमूह जपानच्या होक्कैदिओ आणि रशियाच्या कामचाटका बेटसमूहादरम्यान स्थित आहे.
भारताची भूमिका
रशियासोबत संतुलन राखत भारताने सैन्याभ्यासात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु सागरी युद्धाभ्यासात सामील होण्यास नकार दिला आहे. जपान हा भारताचा घनिष्ठ सहकारी तसेच क्वाडचा सदस्य देश आहे. जपानकडून भारतात प्रचंड गुंतवणूक करण्यात आली आहे.