प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एस. एम. कृष्णा यांनी बुधवारी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक असताना कृष्णा यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
बुधवारी बेंगळूरमधील चित्रकला परिषदेला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एस. एम. कृष्णा यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यापाठोपाठ राजकीय निवृत्तीची घोषणाही केली. आपले वय आता 90 वर्षे आहे. 50 वर्षे वय असल्यासारखे भासविता येणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले आहे.
निवृत्तीविषयी पक्षश्रेष्ठींना माहिती दिली का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, आपल्याला पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे वरिष्ठांना राजकीय निवृत्तीविषयी माहिती दिलेली नाही. आपल्या राजकीय निवृत्तीवेळी भाजपने आपल्याकडे दुर्लक्ष केले, असा प्रश्न उपस्थित होत नाही. वाढत्या वयाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषविलेल्या एस. एम. कृष्णा यांनी डिसेंबर 1989 पासून जानेवारी 1993 या कालावधीत कर्नाटक विधानसभेच्या सभाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. 1999 ते 2004 या कालावधीत कर्नाटकाचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर राज्यसभेवर निवडून आले. याच दरम्यान केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले. 2004 ते 2008 या कालावधीत महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता.