Tarun Bharat

स…समाधानाचा…

Advertisements

‘मॅडम मी खरंच खूप वैतागलो आहे. रमा माझी पत्नी. तिला कसं समजवावं हेच कळत नाही.’

‘का, काय झालं?’

‘अहो…तिचा हव्यास संपतच नाही. कोणतीही जाहिरात पाहिली, मैत्रिणींमध्ये चर्चा झाली की झालं. ती वस्तू हवीच. अगदी शाम्पूपासून कपडय़ापर्यंत, घराचे सजावटीचे सामान असो वा अन्य काही. जाहिराती करणारे त्यांचे काम करणारच हो. पण आपल्याला कळायला नको का. गरज कसली आहे. किती वस्तू घ्यायच्या, कितीवेळा समजावलं तिला पण उपयोग शून्य. सगळय़ाच बाबतीत सगळय़ांशी तुलना. सगळं आहे पण ‘समाधान’ नाही. आता मुलांनाही तीच सवय लागेल अशी भीती वाटते मॅडम. कुणी शेजाऱयाने काही घेतलं की ते हवं. कुणी कुठे फिरायला गेले की हिची भुणभुण सुरू. तसं बघायला गेलं तर कशाला काहीही कमी नाही. पण हव्यास संपतच नाही. मॅडम मी पार वैतागून गेलोय. तिच्यात तर फरक पडण्याची शक्मयता कमी. आता मलाच सांगा मुलांसाठी मी काय करायला हवं..’ रमाकांत अगदी पोटतिडकीने बोलत होते. पुढे चर्चेतून अनेक गोष्टी उलगडत गेल्या.

वरील उदाहरणातील रमासारखी मंडळी अनेक ठिकाणी पहायला मिळतात. अनेकदा ‘जाहिरातीत दाखवतात तसे मला हवेच’ असे त्यांना वाटते, चित्रपट-मालिका यामध्ये दाखवितात तसे छान घर असावे, तशाच वस्तू आपल्याकडे असाव्यात. इतकेच नाही तर चित्रपट, मालिकांमध्ये जसे दाखवतात तसेच प्रेम व्यक्त झाले तरच ते खरे प्रेम अशाही कल्पना अनेकांच्या मनात घर करतात.

टीव्ही, मोबाईल एकंदरीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी समोर येत असतात. तसेच जगणे म्हणजे खरे जगणे असेही काहींना वाटते. काही वेळा तशी मनोवृत्ती, मजेच्या संकल्पना आकार घेऊ लागतात आणि गोंधळ सुरू होतो. परंतु आपल्या आवडीनिवडी वेगळय़ा असू शकतात, खरंच आपल्याला काय आवडतंय, आपली क्षमता, आपली मूल्ये, आपल्या धारणा एकंदरच आपलं व्यक्तिमत्त्व या सर्वांचा विचार सजगपणे करायला हवा. तसा विचार न करता आभासी जगात जर आपण रमू लागलो तर ‘वास्तव आणि सुखावह वाटणारे जग’ यामध्ये अंतर निर्माण होते आणि अस्वस्थतेखेरीज हाती काहीच लागत नाही. दुसऱया व्यक्तीकडे एखादी गोष्ट आहे म्हणून किंवा जाहिरातीत दाखवतात म्हणून आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, की खरंच याची आवश्यकता आहे हे पहायला हवे. उदा..त्याच्याकडे उंची कपडे आहेत, मोबाईल आहे मग तसा मला हवाच, त्यांनी जसे घर सजवले मीही तसेच सजवायला हवे, अमुक व्यक्ती अशा स्टाईलने बोलते मग मलाही तसेच बोलायला हवे.. वगैरे वगैरे..

जरा थांबावं आणि स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधावा. आपल्याला हे सगळं खरंच हवं आहे का? आपल्याला कसे रहायला आवडेल? आपल्याला मनापासून घराची सजावट कशी हवी आहे? आपल्याला मनापासून काय शिकायचे आहे?आपल्या मुलांना खरी कसली आवड आहे? आपली आणि त्यांची नेमकी क्षमता कशी आहे? कशा पद्धतीचा खर्च आपल्याला परवडणार आहे? जाहिरातींमध्ये दाखवितात तशा वस्तूंची खरंच आपल्याला गरज आहे का याचा विचार व्हायला हवा.

गिऱहाईकाने एखादी वस्तू विकत घ्यावी, ती इच्छा ग्राहकाच्या मनात निर्माण व्हावी यासाठी आकर्षक पद्धतीने जाहिरात करणे ही मालाच्या उत्पादकांची गरज आहे आणि त्या पद्धतीने ते करणारही परंतु ती वस्तू घेणे ही आपली खरी गरज आहे का, हे मात्र ज्याचे त्याने पडताळायला हवे. पिढी दर पिढी हे बदल वेगाने होत आहेत हे आपण पाहतोच आहोत.

अर्थात नवी पिढी आपल्या पिढीसारखी नसणे यात काही वावगे नाही. उलट आताची पिढी महत्त्वाकांक्षी आहे, तंत्रज्ञानाने युक्त आहे, याचे खरेतर कौतुकच आहे. धोका वाटतो तो फक्त पसरत चाललेल्या चंगळवादाचा. बाजारात असंख्य प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. वस्तूच्या उत्पादकांना त्या साहजिकच विकायच्या आहेत. त्या वस्तू असणे ही आपली अत्यावश्यक गरजच आहे असे आपल्याला वाटावे अशा प्रकारचे प्रयत्न ते करत राहतात आणि त्यांनी तसे करणे हे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने ठीकच. परंतु आपण काय करायचे हे आपण ठरवायला हवे. होते असे की विविध प्रकारची प्रलोभने आपल्या समोर आल्यावर आपण त्याला फसतो. आपल्याला मग समोर दिसते तेच हवे असते. खूप काही गोष्टी घ्यायच्या असतात आणि त्यासाठी थांबायचीही तयारी नसते. अनेकदा मित्रमंडळीतही यावर चर्चा होते. एखाद्याकडे एखादी गोष्ट नसेल तर, ‘अरे तुझ्याकडे अमुक नाही?क..मा..ल आहे.’ अशा वाक्मयांच्या फैरीही झडतात. त्यावर चर्चा रंगतात.

घरात एसी, कार नसेल तर अवघडल्यासारखे होते वा कमीपणाचे वाटू लागते. नवीन जोडपे असेल तर दोघांचे आईवडील मिळून मुलांना काही कमी पडायला नको म्हणून या गोष्टी घेऊन देतात. नाहीतर ते दोघे हप्त्यांवर या वस्तूंची खरेदी करतात. परंतु गरजा या वाढतच जातात. साधा फ्रिज, डबल डोअरचा फ्रिज, नवीन पद्धतीचे वॉशिंग मशीन, नव्या फॅशनचे दागिने, मोठ्ठं घर…एक ना दोन. ‘अजून अजून अजूनची’ लिस्ट संपत नाही आणि मग हप्त्यांपायी ही नोकरी, ती नोकरी, वाढत्या पगाराची नोकरी ही मालिकाही सुरूच राहते. कितीही घेतलं तरी तिथून पुढे शांतपणे गाडं चाललंय असेही नसते. अलीकडे बऱयाचवेळा असे दिसते की ‘समाधान’ हा शब्द हरवतो आहे. परंतु जर सुखी रहायचे असेल तर तो शोधून पकडून ठेवणे फार गरजेचे आहे.

कुणी सिमल्याला गेले तर लगेच आपण केरळला जायला पाहिजे, कुणी नवीन गाडी घेतली तर आपण लगेच टॉप मॉडेल घेतले पाहिजे.. असे जर आपण करत राहिलो तर अवघड होऊन जाईल. शांतपणे विचार करून स्वतःला आणि कुटुंबीयांना हे पटवून द्यायला हवे की हव्यासाला आणि चंगळवादाला सीमा नाही. इच्छा असणे यात वावगे काही नाही परंतु तिचे लालसेमध्ये, स्पर्धेमध्ये रूपांतर होत नाही ना हे पहायला हवे.

स्पर्धेला, चढाओढीला अंत नसतो. अमुक एवढे मिळाले की समाधान होईल मग आपण संतुष्ट होऊ असे होत नाही. सारा जन्म आपण ‘अजून किंवा आणखी’ च्या मागे धावत रहायचे का? नुसती चैन वा सतत दुसऱयाशी तुलना करण्याच्या मगरमिठीतून आपण सुटलो आणि जास्त अर्थपूर्ण काही करण्यात मन गुंतवले तरच खरे समाधान आणि खरी शांती लाभेल हे निश्चित.

पहा हं..आपण आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले तरी आपल्याहून श्रीमंत आणि उंची वस्तू वापरणारे लोक जगात कितीतरी असतात. तसे पाहिले तर आपण कसे राहतो, किती श्रीमंत आहोत याची कोणाला काय पर्वा असते? आणि समजा कुणी तसे पहातही असेल आणि आपल्याविषयी त्याला मत्सर वाटतो, खूप हेवा वाटतो तर त्याने आपले भले काय होणार? उलट जितक्मया कमी लोकांना आपला मत्सर वाटेल ते चांगले नाही का? आपल्याकडे जे आहे त्याचे कमी प्रदर्शन करावे तितके चांगले. तसे पाहिले तर खरे महत्त्व आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याला, उंचावण्याला आहे. आयुष्यात आपल्याला नेमके काय हवे आहे, आपल्याला काय करायचे आहे आणि आपण काय करतो आहोत, काय ठरवतो यावर आपली मानसिक शांतता अवलंबून आहे. आपल्या इच्छा, क्षमता, प्रयत्नांची तयारी, उपलब्ध परिस्थिती या सर्वांचा प्रामाणिक विचार करून वाटचाल केली तर खख‘समाधान’ शब्दापासून फारकत होणार नाही हे मात्र खरे!!

 -ऍड. सुमेधा संजीव देसाई

Related Stories

चौथ्या टप्प्यातील कृषिक्रांती (कृषी- 4.0)

Patil_p

मुसाफिर हूँ यारों…

Patil_p

चर्चा फक्त कोरोना आणि राजकीय हादऱयांची!

Amit Kulkarni

सत्ता सर्व ही सद्गुरूंची

Patil_p

शतधन्वयाची भेदली मति

Patil_p

दोस्त माझा मस्त

Patil_p
error: Content is protected !!