वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या ऍडलेड खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत आर्यना साबालेन्काने एकेरीचे अजिंक्यपद मिळवताना झेकच्या लिंडा नोसकोव्हाचा पराभव केला. डब्ल्यूटीए टूर 500 महिलांच्या टेनिस स्पर्धेत साबालेन्काने आपल्या वेगवान आणि अचूक सर्व्हिसच्या जोरावर नोसकोव्हाचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. साबालेन्काने या सामन्यात बेसलाईन आणि रॅलीज खेळ करत नोसकोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत नोसकोव्हाने टॉप सिडेड जेबॉरचा तसेच कॅसेटकिना व बेलारुसच्या माजी टॉप सिडेड अझारेंकाचा पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. महिला टेनिसपटूंच्या मानांकनात पाचव्या स्थानावरील साबालेन्का आता 16 ते 29 जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.