मलनिस्सारण समस्या त्वरित सोडवण्याची सूचना
प्रतिनिधी /मडगाव
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी नावेली मतदारसंघातील आकें बायश व दिकरपाल दवर्ली पंचायत क्षेत्रातील विविध भागांना भेट देऊन तेथील मलनिस्सारण समस्यांचा आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लगेच कामे सुरू करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱयांना दिली. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम खाते, मलनिस्सारण विभाग व वीज खात्याच्या अधिकाऱयांसह काब्राल यांनी घाटामरड, झरीवाडा, सैनिक प्रशिक्षण केंद्र, कुडचडकर इमारत परिसर या ठिकाणी भेट देऊन स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. झरीवाडा येथे मलनिस्सारण वाहिनीला जोडलेल्या पंप स्टेशनचे इलेक्ट्रिक पॅनल बसववण्यासाठी जागा निश्चित करून लगेच काम सुरू करण्याची सूचना काब्राल यांनी वीज खात्याच्या अभियंत्यांना केली. कुडचडकर बिल्डिंग तसेच घाटामरड येथील ग्रामस्थांच्याही समस्या ऐकून त्यासंबंधी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या.
यावेळी दिकरपाल दवर्लीचे सरपंच हर्क्युलान नियासो, पंच विद्याधर आर्लेकर, संपदा नाईक व संतोष नाईक, भाजपाच्या नावेली मंडळाचे सरचिटणीस प्रमोद प्रभू व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी नावेली मतदारसंघातील कामांबाबत आस्था दाखवली असून येथील मलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामे 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. घाटामरड व झरीवाडा येथील प्रलंबित कामे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या सूचनेनुसार लगेच हाती घेण्यात येणार आहेत, असे तुयेकर यांनी सांगितले.