मुष्टीयुद्धमध्ये नितीनकुमारला सुवर्ण, हॉकीत बेंगळूर सिटी विद्यापीठाला सुवर्णपदक
बेंगळूर
‘खेलो इंडिया’ आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धेत कुरूक्षेत्र विद्यापीठाचा तिरंदाजपटू सचिन गुप्ताने तीन सुवर्णपदके पटकाविली. त्याचप्रमाणे पुरूषांच्या 86-92 किलो हेवीवेट वजन गट मुष्टीयुद्ध प्रकारात नितीनकुमारने सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या हॉकी या क्रीडाप्रकारात बेंगळूर सिटी विद्यापीठाने सुवर्णपदक पुन्हा स्वतःकडे राखले.
तिरंदाजी या क्रीडाप्रकारात कुरूक्षेत्र विद्यापीठाचा 23 वर्षीय तिरंदाजपटू सचिन गुप्ताने रिकर्व्ह तिरंदाजीच्या तिन्ही प्रकारात सुवर्णपदके मिळविली. पुरूषांच्या एकेरी रिकर्व्ह तिरंदाजीत सचिन गुप्ताने यशदीप भोगेचा 6-4 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर मिश्र रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सचिन गुप्ता आणि किर्ती यांनी सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारामध्ये कुरूक्षेत्र विद्यापीठाच्या तिरंदाजपटूंनी सुवर्णपदक पटकाविले. तब्बल पाच वर्षांनंतर सचिन गुप्ताने तिरंदाजी क्षेत्रामध्ये पुनरागमन केले होते.
पुरूषांच्या 86-92 लाईट हेवीवेट मुष्टीयुद्ध लढतीत नितीनकुमारने सुवर्णपदक मिळविले. 2019 साली नितीनकुमारच्या खांद्याला दुखापत झाली होती. तत्पूर्वी त्याने पुणे येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडास्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. 2018 साली झालेल्या युवा हौशी विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत नितीनकुमारने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
पुरूषांच्या हॉकी या क्रीडाप्रकारात बेंगळूर सिटी विद्यापीठाने अंतिम सामन्यात अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव करत सलग दुसऱयांदा सुवर्णपदक पटकाविले.
या अंतिम सामन्यात 28 व्या मिनिटाला हरीष मुतागरने बेंगळूर सिटी विद्यापीठाचे खाते उघडले. प्रणव गौडाने दिलेल्या पासवर हरीषने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. मध्यंतरापर्यंत बेंगळूर सिटी विद्यापीठाने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 51 व्या मिनिटाला श्रीधरच्या पासवर वसंतकुमारने बेंगळूर सिटी विद्यापीठाचा दुसरा गोल नोंदविला. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना वसंतने दिलेल्या पासवर हरीष मुतागरने बेंगळूर सिटी विद्यापीठाचा तिसरा गोल नोंदवून अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. बेंगळूर सिटी विद्यापीठाच्या 23 वर्षीय हरीषने या स्पर्धेत एकूण 9 गोल नोंदविले.