वृत्तसंस्था/ नूर सुल्तान (कझाकस्तान)
इलोर्डा चषक आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा युवा विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेतील विद्यमान विजेता सचिन सिवाचने पुरूषांच्या 57 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या सिमरनजीत कौरचे आव्हान संपुष्टात आले.
पुरूषांच्या 57 किलो वजनगटातील गुरूवारी झालेल्या स्पर्धेत सचिन सिवाचने तुर्कीच्या जी.येखलासचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पुरूषांच्या विभागात भारताच्या लक्ष्य चहर आणि हर्ष लाक्रा यांचे आव्हान संपुष्टात आले. कझाकस्तानच्या अबेझेलने लक्ष्य चहरचा 5-0 तर कझाकच्या झेकापेकोव्हने हर्ष लाक्राचा 5-0 असा पराभव केला. सदर स्पर्धा 4 जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्याला 700, रौप्यपदक विजेत्याला 400 आणि कांस्यपदक विजेत्याला 200 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.