ऑनलाईन टीम/तरुण भारत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यासाठी सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला आता न्यायालयाने मंजूर दिली आहे.
दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या माफीचा साक्षीदाराचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात अडचणी वाढणार आहे.
अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. सचिन वाझेने ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले होते. ‘या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. ‘सीआरपीसी’च्या कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो’, असे सचिन वाझेने पत्रात म्हटले होते. त्यानुसार, न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घेत सचिन वाझेच्या अर्जाला मंजुरी दिली आहे.