वार्ताहर /हलगा
हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी सदानंद बिळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवार दि. 24 रोजी ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
हलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष गणपत मारिहाळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे हलगा ग्रामपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी निवड होणार होती. मंगळवार दि. 24 रोजी हा निवडणूक कार्यक्रम पार पडला. सकाळी साडेदहापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयमध्ये सदानंद बिळगोजी यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी आला होता. अन्य कुठल्याही सदस्याने अध्यक्षपदासाठी अर्ज केला नव्हता. या निवड प्रक्रियेवेळी हलगा ग्रामपंचायतीचे सर्व अठरा सदस्य उपस्थित होते. सदानंद बिळगोजी यांचा अर्ज वैध झाल्याने व एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून हेस्कॉमचे ग्रामीण सहाय्यक कार्यकारी अभियंता वैशाली तुडवेकर उपस्थित होत्या. पीडिओ विजयालक्ष्मी तेग्गी व सेपेटरी जोसेफ फर्नांडिसही उपस्थित होते. सदानंद बिळगोजी यांची निवड झाल्यानंतर उपस्थित समर्थकांनी सदानंद बिळगोजी व ग्रामपंचायत माजी अध्यक्ष गणपत मारिहाळकर यांना भगवे फेटे बांधून व पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी, गणपत मारिहाळकर, विलास परीट, पिराजी जाधव, भुजंग सालगुडे, सागर कामानाचे, तावनाप्पा पायक्का, नझीर मुल्ला, रूपा सुतार, रेखा परीट, लक्ष्मी संताजी, रेखा चिकपरप्पा, सरोजिनी वडगावी, लक्ष्मी गजपती, भारती पायक्का, सुजाता देसाई आदी उपस्थित होते. बिळगोजी हे दुसऱयांदा ग्रामपंचायतीवर निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी हलगा ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.