करमाळा/प्रतिनिधी
साङे (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत कोटलिंगनाथ जोगुबाई यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मुख्य यात्रा शुक्रवार २१ एप्रिल रोजी संपन्न होणार असून या दिवशी सायंकाळी भव्य छबिना मिरवणूक होणार आहे. व शनिवार दि.२२ रोजी कुस्त्यांचे भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा बरोबरच पुणे, मुंबई परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोटलिंग देवाच्या यात्रेसाठी विविध ठिकाणावरून भाविक उपस्थित असतात.
कोटलींग यात्रा ही तालुक्यातील मोठी यात्रा समजली जाते . या ग्रामदैवताची यात्रा शांततेत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना विविध सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमीटी व ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात आली आहे . गुढीपाडव्या नंतर देवाला तेल लावण्याचा विधी , यात्रेची औपचारिक सुरुवात होते. वीस दिवसांच्या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर तेलवान कडकपणे पाळले जाते. या काळात परिसरातील मांसाहार पुर्णपणे बंद असतो, शेती मशागतीची कामे बंद , दाढी करणे, केस कापणे ही कामे करत नाहीत.
या दिवशी देवाच्या मानाच्या कावडी व भाविक धार घालण्यासाठी उपस्थित असतात .सर्व धर्म समभावाचे प्रतिक असणाऱ्या या यात्रेत “चांगभले च्या जयघोषात” गुलालाची उधळण करत फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येते. विविध जाती धर्मातील भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष ही यात्रा होऊ शकली नाही या पार्श्वभूमीवर या वर्षी यात्रेसाठी भाविकांची संख्या लक्षात घेता साङे ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आले असून यात्रेकरूंसाठी या मंदिराकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती, शुद्ध स्वच्छ पाणी, पार्किंग, सायंकाळी परिसरात उजेडाची व्यवस्था, महाप्रसाद, प्राथमिक आरोग्य उपचार अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.