दोन वर्षांनी ढोल-ताशांचा होणार गजर : चित्ररथ मिरवणुकीची जय्यत तयारी : 50 हून अधिक सजीव देखावे
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागासह महाराष्ट्र व गोव्याचे लक्ष लागलेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवार दि. 4 रोजी बेळगाव शहरात होणार आहे. डोळय़ांचे पारणे फेडणारे शिवचरित्रावरील सजीव देखावे शिवभक्तांना पाहता येणार आहेत. चित्ररथ देखाव्यांसाठी संपूर्ण शहर भगवेमय झाले असून देखावे पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय बुधवारी लोटणार आहे. शिवजयंती उत्सव मंडळांनीही मिरवणुकीची जय्यत तयारी केली असून ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणूक होणार आहे.
बेळगावमध्ये सजीव देखावे चित्ररथावर सादर होत असल्याने मोठय़ा संख्येने शिवभक्त मिरवणूक पाहण्यासाठी दाखल होतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शिवभक्तांचा हिरमोड झाला होता. परंतु यावषी अमाप उत्साहात मिरवणूक काढली जाणार आहे. यावषीच्या चित्ररथ मिरवणुकीत 50 हून अधिक सजीव देखावे सादर केले जाणार आहेत. एकापेक्षा एक सरस असे देखावे मंडळे सादर करणार आहेत. यावषी चव्हाट गल्ली येथील चित्ररथावर 50 हून अधिक कलाकारांनी साकारलेला सजीव देखावा शिवभक्तांना पाहता येणार आहे.
ढोल-ताशांचा होणार गजर
बेळगावमध्ये ऐतिहासिक अशी शिवजयंती साजरी होते. लाठय़ा-काठय़ा, लेझीम, दानपट्टा, करेला, तलवारबाजी अशा कला मिरवणुकीत सादर केल्या जातात.
बेळगावमध्ये अनेक ढोल-ताशा पथके असून त्यांचा गजर बुधवारी ऐकता येणार आहे. ढोल-ताशांच्या सोबतीला ध्वजपथकही सज्ज असणार आहेत. मागील महिन्याभरापासून ढोल-ताशा तसेच इतर कलाकारांनी सराव सुरू ठेवला आहे.
शहापूरमध्ये आज भव्य चित्ररथ मिरवणूक
बेळगावसोबतच शहापूर विभागात मोठय़ा उत्साहात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. बुधवारी सायंकाळी 7 वा. बॅ. नाथ पै चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
उद्घाटन सोहळय़ावेळी पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांना उपस्थित राहण्याचे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, शहापूर विभागाच्यावतीने मंगळवारी करण्यात आले. अध्यक्ष नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, गणेश दड्डीकर, महेश जुवेकर यांसह इतर उपस्थित होते.
शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे आवाहन
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शिस्तबद्धरित्या पूर्ण व्हावी यासाठी मंडळांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. मंडळांनी दुपारी 4 वाजल्यापासून नरगुंदकर भावे चौकात चित्ररथ आणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे वेळेत चित्ररथ निघण्यास मदत होणार असून शिवप्रेमींनाही चित्ररथ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महामंडळाने 100 हून अधिक स्वयंसेवक नेमले असून प्रत्येक मंडळाला ते सहकार्य करणार आहेत. कोणतीही अडचण आल्यास 9964370261 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.
तरुण भारत यू टय़ूब-फेसबुक पेजवरून चित्ररथ मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण होणार
तरुण भारत यू टय़ूब व फेसबुक पेजवरून सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव बेळगाव आयोजित भव्य चित्ररथ मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून हे प्रक्षेपण केले जाणार आहे. बेळगाव तसेच बेळगावच्या बाहेर राहणाऱया शिवभक्तांना घरबसल्या भव्यदिव्य अशी शिवजयंती पाहता येणार आहे. ‘तरुण भारत न्यूज’ या यू टय़ूब चॅनेल व फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
शहरातील मिरवणूक मार्ग
बुधवारी सायंकाळी 6 वा. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नरगुंदकर भावे चौक येथे पालखी पूजन होईल. त्यानंतर चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मारुती गल्लीमार्गे हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक येथून हेमू कलानी चौकात मिरवणुकीची सांगता होणार आहे.
शहापूर मिरवणूक मार्ग
नाथ पै चौक येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन खडेबाजार शहापूर, एसपीएम रोड, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, शनिमंदिर, स्टेशन रोड, उभा मारुती, धर्मवीर संभाजी चौक मार्गे मुख्य मिरवणुकीत चित्ररथ सहभागी होणार आहेत.
शिवजयंती मिरवणूक मार्गावर पार्किंग बंदी : पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांचा आदेश
शिवजयंती मार्गावर अडथळा होऊ नये यासाठी बुधवारी दुपारपासूनच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बुधवार दि. 4 रोजी दुपारी 2 पासून या परिसरात दुचाकी व चारचाकी पार्किंगवर बंदी असणार आहे. तेव्हा प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे. बेळगावात शिवजयंती मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. या शिवजयंतीनिमित्त चित्ररथ देखावे काढले जातात. त्यासाठी मार्गही ठरविण्यात आला आहे. त्या मार्गावर मिरवणुकीला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दुपारी 2 पासूनच पार्किंगबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.