जिल्हा पोलीस दलाची नवी संकल्पना : नागरिकांना सेवा पुरवताच अॅपच्या माध्यमातून मिळतोय प्रतिसाद
प्रतिनिधी/सातारा
जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे, त्यांना योग्य सेवा देणे हे प्रथम कर्तव्य आहे. कर्तव्य पार पडताना नागरिकांच्या सर्व शंकाचे निराकरण होते का? हे पाहण्यासाठी समाधान अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात आहेत. या अॅपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून मारहाण, फसवणूक, जेष्ठ मंडळी, महिलांना त्रास देणे, खून, अपहरण बेपत्ता होणे, कौटुंबिक हिंसाचार अशा अनेक प्रकारच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. तक्रार दाखल करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळी त्यांना धीर देणे, तक्रार दाखल करून घेणे अशी आव्हाने पोलीसांसमोर निर्माण होतात. पोलीस 24 तास सेवा देण्यास तत्पर असतात. परंतु या सेवा दिल्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया ही घेणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी समाधान ऍपची संकल्पना सूरू केली आहे.
अशी आहे अॅपची संकल्पना
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास येणाऱ्या नागरिकांचे नाव, पत्ता व फोन नंबर घेतले जाते. ही सर्व माहिती या ऍप मध्ये भरली जाते. यानंतर या फोन नंबरवर मॅसेजद्वारे लिंक जाते. ही लिंक ओपन करताच संबंधित पोलीस ठाण्याचे नाव येते. भेटीचा उद्देश विचारून तक्रार दाखल करणे, अर्ज चौकशी, पारपत्र, चारित्र्य पडताळणी, कार्यक्रम, ध्वनीक्षेपक/इतर परवानगी, ट्रॉफिक चालनाबाबत, पोलीस संरक्षण मिळण्याबाबत, इतर कामानिमित्त असे पर्याय येतात. त्यातील एक नागरिक निवडतात. पुढे अधिकारी/अंमलदार भेटवायचे होते, त्यांची व आपली भेट झाली काय? पोलिसांचे आपल्याशी वर्तन कसे होते? आपले काम/तक्रारीबाबत पोलीसांचा प्रतिसाद कसा वाटला, आपले भेटी दरम्यान, पोलीस स्थानकाची स्वच्छता व नीटनेटकेपणा कसा वाटला? आपण पोलीस ठाण्याच्या एकंदरीत कामकाजाबाबत कितपत समाधानी आहात? असे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांच्या उत्तरासाठी हो, नाही असे पर्याय दिले आहेत. या पर्यायावर क्लिक करून ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या अभिप्राय या अॅपच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहचत आहे.
संकल्पनेचे कौतुक
समाधान अॅप हे नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे. यातून नागरिकांना पुरवण्यात येणाऱया सेवावर ते कितपत समाधानी आहेत हे कळत आहे. हे अॅप सुरू होवून काहीच दिवस झाले आहेत. तरीही याला सातारकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या अपॅचे कौतुक होत आहे.
तुमचे मत मांडण्याची संधी
पोलीस अधीक्षक बन्सल यांची ही संकल्पना जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात सुरू आहे. यामुळे नागरिकांनी या अॅपच्या माध्यामातून आपल्या तक्रारी मांडल्या की त्यातून पोलीस दलाल आणखी सुधारणा होणार आहे. तसेच अजून सेवा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. – भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे