अल-जवाहिरीच्या जागी नियुक्ती, ओसामा बिन लादेनच्या सुरक्षेचीही सांभाळली होती जबाबदारी
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्र
जगभरात दहशतवादी संघटना असलेल्या ‘अल-कायदा’ला आता नवा नेता मिळाला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात अयमान अल-जवाहिरीचा मृत्यू झाल्यानंतर सैफ अल-अदेलची ‘अल-कायदा’चा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मात्र, तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानच्या राजकारणात झालेल्या उलथा-पालथीमुळे ‘अल-कायदा’ सध्या ही घोषणा करणे टाळत आहे. गेल्यावषी जुलैमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ‘अल-कायदा’ प्रमुख अयमान अल-जवाहिरी मारला गेला होता. यानंतर दहशतवादी संघटना आपल्या नव्या नेत्याच्या शोधात होती. आता ‘अल-कायदा’च्या प्रमुखाबाबत नवा खुलासा झाला आहे. जुलै 2022 मध्ये अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर इराणस्थित इजिप्शियन सैफ अल-अदेल हा आता ‘अल-कायदा’चा प्रमुख बनला आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रानेही याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
सैफ अल-अदेल हा इजिप्शियन लष्कराचा माजी कर्नल असून त्याचे ‘अल-कायदा’शी 1980 च्या दशकापासून घनिष्ट संबंध आहेत. प्रशिक्षण शिबिरात भरती झालेल्यांना प्रशिक्षण देणे ही दहशतवादी संघटनेतील त्याची महत्त्वाची जबाबदारी होती. 9/11 चा दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्याने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे मानले जात आहे. दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या सुरक्षेची जबाबदारीही त्याच्यावर होती. ओसामा बिन लादेनचा माजी अंगरक्षक नसीर अल-बहरी याने आपल्या ‘गार्डिंग बिन लादेनः माय लाइफ इन अल-कायदा’ या पुस्तकात सैफ अल-अदेलचा ‘नेता’ म्हणून उल्लेख केला आहे. तथापि, तालिबान अधिकाऱयांच्या चिंतेमुळे अफगाणिस्तानातील ‘अल-कायदा’ने त्याला अधिकृतपणे आपला प्रमुख म्हणून घोषित केले नाही. इराणमध्ये राहणाऱया सैफ अल-अदेलच्या मुद्यावर ‘अल-कायदा’ संवेदनशील असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या (युएन) अहवालात म्हटले आहे. सैफ अल-अदेल 2002-2003 पासून इराणमध्ये आहे. पूर्वी तो नजरकैदेत होता, पण नंतर त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला. सैफ हा जगभरातील जिहादी चळवळीतील सर्वात अनुभवी दहशतवाद्यांपैकी एक असून त्याच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. जेव्हा तो हल्ला करतो तेव्हा तो निर्दयी आणि भयंकर रीतीने करतो. त्याचे दहशतवादी हल्ल्याचे नियोजनही खतरनाक असते, असे युएनच्या अहवालात म्हटले आहे.
सैफ अल-अदेलची ओळख
‘अल-कायदा’चा स्फोटक तज्ञ सैफ अल अदेलचा जन्म 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला इजिप्तमध्ये झाला. त्याचे खरे नाव मोहम्मद सलाह अल-दिन झैदान असल्याचे मानले जाते. परंतु सैफ अल-अदेल या नावामागे एक कथा आहे. सैफ अल-अदेल म्हणजे न्यायाची तलवार. त्यामुळेच त्याचे नाव बदलण्यात आल्याचे बोलले जाते. तो इजिप्शियन सैन्यात कर्नल होता. 1988 मध्ये इजिप्शियन राष्ट्राध्यक्ष अन्वर अल-सदात यांच्या हत्येनंतर, सोव्हिएत सैन्याला हुसकावून लावण्यासाठी त्यांनी अफगाणिस्तानमधील मुजाहिदीनमध्ये सामील होण्यासाठी इजिप्त सोडला. येथून तो लेबनॉनला गेल्याचे मानले जाते. अदेल हा ‘अल-कायदा’च्या मजलिस-ए-शुरा आणि लष्करी समितीचा सदस्य आहे. त्याने अफगाणिस्तान, सुदान आणि पाकिस्तानमध्ये अनेक छुपी शिबिरेही चालवली. तसेच सोमालियातील रास कंबोनी येथे केनियाच्या सीमेजवळ प्रशिक्षण केंद्रही चालवले होते. अमेरिकेने अदेलवर 82 कोटींचे बक्षीस ठेवले होते.