सिंगापूर ओपन बॅडमिंटन : सिंधू, प्रणॉय, अर्जुन-धुव कपिलासह उपांत्यपूर्व फेरीत, मंजुनाथ, अश्मिता पराभूत
वृत्तसंस्था/सिंगापूर
ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायना नेहवालने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद करताना चीनच्या जागतिक नवव्या मानांकित हे बिंग जिआवला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. याशिवाय पीव्ही सिंधू, एसएच प्रणॉय, पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन-धुव कपिला यांनीही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले.
दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱया सायनाने पाचव्या मानांकित बिंग जिआववर 21-19, 11-21,
21-17 अशी मात करीत आगेकूच केली. सुमारे अडीच वर्षांच्या खंडानंतर सायनाने सुपर 500 स्पर्धेत प्रथमच इथवर मजल मारली आहे. गेल्या काही वर्षापासून तिला दुखापतीची समस्या व फॉर्ममधील घसरण या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने तिला गेल्या काही स्पर्धांत संघर्ष करावा लागला होता. गेल्या एप्रिलमध्ये तिने राष्ट्रकुल निवड चाचणीत भाग घेणेही टाळले होते. गेल्या वर्षी अर्लीन्स मास्टर सुपर 100 स्पर्धेत तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि हीच तिची गेल्या दोन वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. 2020 मध्ये मलेशिया मास्टर्स व बार्सिलोना मास्टर्स स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
सिंधू, प्रणॉय शेवटच्या आठमध्ये
दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारी पीव्ही सिंधू व प्रणॉय यांनीही शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. तिसऱया मानांकित सिंधूने व्हिएतनामच्या थुय लिन्ह एन्ग्युएनचे कडवे आव्हान 19-21,
21-19, 21-18 असे संपुष्टात आणले. तिची उपांत्यपूर्व लढत चीनच्या हान युईविरुद्ध होईल. जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणाऱया एचएस प्रणॉयने जागतिक चौथा मानांकित व येथे तिसरे मानांकन मिळालेल्या तैपेईच्या चौ तिएन चेनवर तीन आठवडय़ात दुसरा विजय मिळविला. प्रणॉयने चेनवर 14-21,
22-20, 21-18 अशी मात केली. सुमारे सव्वा तास ही लढत रंगली होती. पाच वर्षापासून जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱया प्रणॉयची पुढील लढत जपानच्या कोदाइ नाराओकाशी होणार आहे.
मिथुन, अश्मिताचे आव्हान समाप्त
पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन व धुव कपिला यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना मलेशियाच्या सहाव्या मानांकित गोह झे फेई व नूर इझुद्दिन यांना 18-21, 24-22, 21-18 असे चकित केले. आधीच्या फेरीत के. श्रीकांतला पराभवाचा धक्का दिलेल्या मिथुन मंजुनाथचे आव्हान मात्र संपुष्टात आले. संघर्षपूर्ण लढतीत त्याला आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनकडून 10-21, 21-18, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीत थायलंडच्या ओ. बुसाननला धक्का दिलेल्या भारताच्या अश्मिता चलिहाची घोडदौडही रोखली गेली. तिला चीनच्या हान युईने 21-9, 21-13 असे हरवित आगेकूच केली. याशिवाय महिला दुहेरीत चीनच्या सहाव्या मानांकित लि वेन मेई व डु युई यांनी भारताच्या पूजा दंडू व आरती सारा सुनीलचा 21-12, 21-6 असा पराभव केला.