मुंबई उपविजेतेपद, ओंकार मोरे उत्कृष्ट खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
ओमकार मोरेने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर पीटीएम कोल्हापूर संघाने अलफते मुंबई संघाचा 1-0 असा पराभव करून दहावा साईराज ऑल इंडिया फुटबॉल चषक पटकाविला. ओंकार मोरेला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवित सायकल बक्षीस देण्यात आले. उमेश रावत उत्कृष्ट गोलरक्षक, तुषार देसाई उत्कृष्ट डिफेंडर यांना चषक देवून गौरविण्यात आले.
पहिल्या उपांत्य सामना अलफते मुंबई व एसआरएस गोवा पोलीस यांच्यात झाला. या सामन्यात अलफते संघाने गोवा पोलीस संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. एकमेव गोल आसीफ शेखने हेडद्वारे गोल नोंदवला. दुसऱया उपांत्य सामन्यात पीटीएम कोल्हापूर संघाने बुफा इलाईट बेळगाव संघाचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पीटीएमतर्फे प्रतिक बदामी व ओंकार मोरे यांनी गोल केले. बुफा इलाईटतर्फे कौस्तुभ गेंजीने एकमेव गोल केला.
अंतिम सामना पीटीएम कोल्हापूर व अलफते मुंबई यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी जॅकी मस्करंस, राजेश जाधव, कृष्णराज महाडिक, शितल वेसने, महेश फगरे, रोहित फगरे, राहुल फगरे आदी मान्यवरांना दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून दिल्यानंतर सामन्याला सुरूवात करण्यात आली. दोन्ही संघानी पहिल्या मिनिटापासून आक्रमक चढाया केल्या. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱया सत्रात पुन्हा दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आक्रमक चढाया केल्या. 42 व्या मिनिटाला मुंबईच्या आसीफ शेखने मारलेला फटका पीटीएमच्या गोलरक्षकाने अडविला. 47 व्या मिनिटाला ऋषिकेश मेथेपाटीलने मारलेला वेगवान फटका मुंबईचा गोलरक्षक उम्मीद रावतने आपल्या डावीकडे झेपावत अडविला. 53 व्या मिनिटाला पीटीएम कोल्हापूरचा लेफ्टआऊट ओंकार मोरेने बचाव फळीला चकवत डी बाहेरून जोरात मारलेला फटका गोलमुखात मारत आघाडी घेतली. त्यानंतर अलफते मुंबईने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अनुभवी पीटीएमच्या बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांना यश मिळू दिले नाही. बक्षीस वितरणास प्रमुख पाहुणे जॅकी मस्करन्स, राजेश जाधव, महेश फगरे, रोहित फगरे, राहुल फगरे, शितल वेसने, सारंग राघोचे, विठ्ठल गवस, अमर नाईक, हर्ष जॉन थॉमस, अमित जवळकर, नितेश गोडसे, कृष्णा जैनोजी, सतिश गोटाडकी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पीटीएम कोल्हापूर संघाला 75 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या अलफते मुंबई संघाला 51 हजार रूपये रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक उमेद रावत (मुंबई), उत्कृष्ट डिफेंडर तुषार देसाई (गोवा), उत्कृष्ट मिडफिल्डर कैलास पाटील (कोल्हापूर), उत्कृष्ट फॉरवर्ड ऋषिकेश मेथे पाटील पीटीएम, स्पर्धेत सर्वाधिक गोल अन्सारी (अलफते मुंबई) यांना चषक देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आंsकार मोरे याला सायकल व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून कोल्हापूर सॉकर फुटबॉल संघटनेचे पंच संदीप पोवार, हर्षल राऊत, माणिक पाटील, सुमित जाधव, अजिंक्मय गुर्जर यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद चव्हाण, विजय रेडेकर, अक्षय चव्हाण, विरेश मालाबदी, निलेश साळुंके, अमरदीप पाटील, महादेव नावगेकर, ओंकार आजगावकर, महांतेश अक्षरी, संतोष दळवी आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.