ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीर याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अमेरिकन एजन्सी FBI ने 5 मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी ISI ने साजिद मीरचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते.
FBI च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत साजिद मीरचा समावेश आहे. तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे. त्याला टेरर फंडिंग प्रकरणात लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तान सरकारने नेहमीच साजिद मीर जिवंत नसल्याचा दावा केला होता. साजिद मीर हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सुत्रधार आहे. या हल्ल्यात जवळपास 170 लोक मारले गेले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय, अमेरिकन आणि जपानसह अनेक ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता.
जवळपास 12 वर्ष अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश मीरला शोधत आहेत. FBI च्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, साजिद मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे. तो कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे. मीरच्या अटकेबाबत पाकिस्तानने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.