Tarun Bharat

सकाम पुरुषांचा स्वर्ग सत्य आहे यावरच विश्वास असतो

Advertisements

अध्याय एकविसावा

भगवंत म्हणाले, उद्धवा माझ्या वेदाचा भाव अगम्य आहे पण त्यातील गूढार्थ न समजल्यामुळे सकाम मनुष्य मोठय़ा उत्साहाने स्वर्गालाच सत्य मानतो!

केवळ रुची उत्पन्न होण्यासाठी वेदाने स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे पण तेच खरे मानून कामलुब्ध लोक अनेक प्रकारची स्वर्गादिक साधने मोठय़ा उत्साहाने करू लागतात. स्वतःला मांसभक्षण करायला मिळावे म्हणून यज्ञाचे निमित्त करतात. आपली इच्छा पूर्ण होण्याकडेच त्यांची दृढतर प्रवृत्ती असल्यामुळे अविधीनेच पशूची हत्या करतात. अविधीने साधन केल्यामुळे ते महामूर्ख अघोर नरकाला मात्र जातात. अशा प्रकारे सकाम लोक संपूर्ण बुडतात.

पशु वधाला आळा घालण्यासाठी वेदाने केवळ यज्ञाकरिताच पशूचे हनन करावे असा निर्बंध लावून दिला आहे. त्यातही देश, काल, वर्तमान, मंत्र, तंत्र, विधी, विधान आणि सारे द्रव्य ही शुद्ध असावीत असाही निर्बंध घातलेला आहे. तसेच यज्ञासाठी पशुवध करणारा सशक्त, ज्ञानसंपन्न व श्रीमान् असा पाहिजे कारण मुठीच्या तडाक्याने पशु मारताना त्याने जर ‘मे मे’ असा शब्द केला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते. अशी वेदाची आज्ञा मोठी बिकट आहे. जो त्या आज्ञेचे उल्लंघन करेल त्याच्यासाठी मोठमोठी अवघड प्रायश्चित्ते सांगितली आहेत, तरी महामुर्ख सकाम लोक पशु मारावयास धावतच असतात! अशा रीतीने पशु मारल्यानंतर प्रमाणाने जेवढा वाटा येईल तेवढाच भक्षण करावा पण तोसुद्धा दाताला न लागू देता. आपला वाटा खाताना जो कोणी त्याची चव घेईल, त्यानेही प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असाही वेदाने निर्बंध घातला आहे.

सारांश, मांसभक्षण करावे अशी वेदाची आज्ञा नाही उलट मांसभक्षणापासून दूर राहण्यासाठीच नियम लावून दिले आहेत असे तू समज. तसेच यज्ञातील भागाला प्रमाण ठेवले आहे. वेदात मासभक्षणाचा उल्लेख केवळ जे यासाठी उतावळे असतात त्यांच्याकरता नाईलाज म्हणून केला आहे म्हणजेच वेदाचे सांगणे मूर्खाच्या लोभिष्टपणाकरताच आहे बाकी पशुहिंसाही करू नये व मांसभक्षणही करूं नये, हेच वेदाचे खरे गुह्य आहे. ते माझे मत लक्षात न घेता, विषयलोलुप दुष्ट लोक हिंसेच्या खेळात पशूंना मारतात आणि त्यांच्या योगाने देव, पितर आणि भूतपतींना उद्देशून यज्ञ करतात. वेदोक्त विधीला न जुमानता पशुहत्येचा जे खेळ खेळतात, ते अविधीने पशुवध करून याज्ञिकपणाची आढ्यता मिरवितात !

अविधीने जीव घेऊन त्या पशूने यज्ञ करतात आणि खुशाल पितृ-देव-भूतगण ह्यांना हविर्भाग देतात. पोकळ अथवा भाजलेले बी घेऊन शेतात पेरले, तर पिकाला मुकावेच लागेल इतकेच नव्हे, तर बी नाहीसे होतेच आणि सरकारचा सारा मात्र भरावा लागतो! अविधीने यज्ञ करणाऱयांची गती अशीच होते. स्वर्ग तर स्वप्नातसुद्धा दिसत नाही आणि असलेला नरदेह मात्र गमावतात व शेवटी यमयातनेचे दुःख भोगतात! पशूंना व्यर्थ दुःख देतात आणि त्यामुळे स्वतः दुःखी होतात, अशी यज्ञ करणाऱयांची गती होते. स्वर्ग इत्यादी लोक स्वप्नासारखे नाशवंत आहेत परंतु त्यांची वर्णने कानाला गोड वाटतात त्यामुळे तेथील भोगांची आशा मनात बाळगून त्यासाठी माणसे आपल्याजवळील धन खर्च करून टाकतात. ज्याप्रमाणे व्यापारी अधिक नफ्याच्या आशेने समुद्रप्रवासासारखी साहसे करून आपले मूळ भांडवलसुद्धा गमावून बसतात तसंच काहीसं हे आहे.

स्वप्न दिसते आणि लागलीच नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या जगाची अवस्था आहे. ज्याप्रमाणे जग मिथ्या आहे त्याप्रमाणे स्वर्गही मिथ्या म्हणजे तात्पुरता आहे पण  कामनेने वेडावलेल्या सकाम पुरुषांचा स्वर्ग सत्य आहे यावरच विश्वास असतो.

मृगजळ हेच मुळात मिथ्या असते तरी त्यातले गार पाणी द्या म्हणून मुलाने हट्ट करावा, त्याप्रमाणे सकाम लोक स्वर्गासाठी हट्ट घेऊन बसतात. एखादा रस्ता पिंपळावरून जातो असे कोणी म्हंटले तर त्याचा शब्दशः अर्थ घेऊन, जर एखादा त्या वृक्षावर चढू लागला तर, तो जसा भ्रमाने गुंतून राहतो, त्याप्रमाणे स्वर्गाचे वैभव ऐकून सकामाची दशा होते.

क्रमशः

Related Stories

जम्मू काश्मीरमधील नागरिकांची आकांक्षापूर्तीच्या दिशेने वाटचाल

Patil_p

दोष ना कुणाचा!

Omkar B

शिवसंवाद यात्रेचा राजकीय धुरळा

Patil_p

‘चवथ’ – गोव्याचा आगळा-वेगळा गणेशोत्सव

Patil_p

कृष्ण बलराम हस्तिनापुरात

Patil_p

शुभ्र काही भिवविणे

Patil_p
error: Content is protected !!