वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या लवलिना बोर्गोहेनने महिलांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये साक्षी चौधरीसह आपल्या गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
साक्षी (54 किलो गट) व लवलिना (75 किलो गट) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर 5-0 याच गुणफरकाने विजय मिळविले. लवलिनाने मेक्सिकोच्या व्हॅनेसा ऑर्टिझचा तर साक्षीने कझाकस्तानच्या झझिरा उराकबाएव्हाचा पराभव केला. मात्र सर्वात चमकदार प्रदर्शन केले ते प्रीतीने. 54 किलो गटाच्या लढतीत प्रीतीने शानदार खेळ केला. पण अखेर तिला थायलंडच्या जितपाँग जुटामासकडून 4-3 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. ही लढत इतकी अटीतटीची झाली की निकालनिश्चितीसाठी रिव्हय़ूचा आधार घ्यावा लागला.
प्रीतीचा वादग्रस्तरित्या संघात समावेश करण्यात आला होता. तिने राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकलेली नसतानाही तिला संघात स्थान दिल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र 19 वर्षीय प्रीतीने या स्पर्धेत बिनधास्त प्रदर्शन करीत आपली निवड सार्थ ठरविली. तिने अनुभवी जितपाँगविरुद्ध जोरदार खेळ करीत पहिली फेरी 4-1 अशी जिंकली. नंतरच्या दोन फेऱयांत दोघींमध्ये तोडीस तोड खेळ झाला. पण अखेर जितपाँगने निसटता विजय मिळवित बाजी मारली.
75 किलो वजन गटात खेळणाऱया लवलिनाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. तिने आपल्या पहिल्या लढतीत सहज विजय मिळवित पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. मेक्सिकन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सुरुवातीला ती बचावात्मक खेळत होती. ‘माझी ही पहिलीच लढत होती. ती माझ्यापेक्षा उंचीने बरीच कमी होती, त्यामुळे माझे डावपेच पूर्णपणे मला राबविता आले नाहीत. माझ्या खेळावर मी बिलकुल समाधानी नाही. मी यापेक्षा सरस प्रदर्शन केले असते. ती पुढे पुढे येत होती, त्यामुळे मला मागे जावे लागत होते,’ असे लवलिना म्हणाली. या वजन गटात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मी प्रथमच खेळत आहे. इतर बॉक्सर या वजन गटात नियमित खेळत असल्याने मला त्यांच्याविरुद्ध खेळणे कठीण जाऊ शकते, असेही ती म्हणाली.
2021 मधील आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्यविजेत्या साक्षीने आपल्या उंचीचा व लांब हातांचा लाभ उठविला. उराकबाएव्हाला ती ठोसा लगावून लगेचच मागे सरकत होती. त्यामुळे उराकबाएव्हाला प्रतिहल्ला करण्याची संधीच मिळत नव्हती. रिंगणभर डान्स करीत प्रीतीने आक्रमक खेळ करून अनेक ठोसे लगावत अखेर विजय साकार केला.