पुणे : एका पाठोपाठ तीन मुली झाल्याने जळगावमधील एका निर्दयी पित्याने आपल्या सहा दिवसांच्या मुलीची पुण्यातील दोन तृतीयपंथीयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. Sale of six-day-old girl to two transgender in Pune
पुण्यातील कर्वेनगर येथील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या दोन तृतीयपंथींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीला त्यांनी 21 ऑक्टोबर 2021 रोजी विकत घेतले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी 23 सप्टेंबर 2022 रोजी हे बाळ ताब्यात घेतले. जळगावमधील बापाकडून सहा दिवसांची ही मुलगी विकत घेताना त्यांनी दत्तक घेण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी या मुलीला विकत घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अधिक वाचा : ‘हॉरर शो’साठी मंडळाने चक्क ग्रेड सेपरेटर मागितला भाड्याने
जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर तसेच सदस्य वैशाली गायकवाड, श्यामलता राव, पूर्वी जाधव, आनंद शिंदे यांनी याच्या देखभालीसाठी बालकाला एका संस्थेकडे सुपूर्त केले आहे. या दोन तृतीयपंथींनी मुलगी दत्तक घेतल्याची कबुली दिली असून, तिच्या आईवडिलांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. मुलीची विक्री करणारा बाप आणि खरेदी करणारे तृतीयपंथी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 80 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.