आजारपणामुळे घेतला निर्णय
तेलगू अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या प्रकाशझोतापासून पूर्णपणे दूर आहे. समांथाने अनेक चित्रपटांमधून माघार घेतल्याची चर्चा आहे. समांथा काही काळासाठी कामातून बेक घेत स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करू पाहत असल्याचे बोलले जात आहे.
द फॅमिली मॅन सीझन 2 च्या प्रचंड यशानंतर समांथाने अनेक बॉलिवूड चित्रपट स्वीकारले होते, परंतु तिने आता निर्मात्यांना चित्रपट सोडत असल्याचे कळविले आहे. आपल्याला एका मोठय़ा ब्रेकची गरज असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. युमळे निर्मात्यांनी अन्य पर्यायांवर विचार चालविला आहे.
समांथा ही मायोसायटिस नावाच्या आजाराला तोंड देत आहे. या आजारामुळे ती सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. स्वतःच्या प्रकृती अस्वास्थामुळे समांथाला स्वतःच्या यापूर्वीच्या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमांमध्ये सहभागी होता आले नव्हते.
समांथा लवकरात लवकर विजय देवरकोंडासोबतचा चित्रपट ‘कुशी’चे चित्रिकरण संपविणार आहे. त्यानंतर ती चित्रपटजगतापासून काही काळ दूर राहणार आहे. पुढील काही काळ ती कुठलेच नवे चित्रपट स्वीकारणार नसल्याचे तिच्या टीमकडून निर्मात्यांना कळविण्यात आले आहे. कुशी एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असून याचे दिग्दर्शन शिवा निरवानाने केले आहे. हा चित्रपट आता फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.