प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची 25 डिसेंबर रोजी कंग्राळी खुर्द येथे जाहीर सभा होणार आहे. सकाळी 9.30 वा. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या सभेमध्ये यावर्षीची गडकोट मोहीम, सुवर्ण सिंहासनासाठी जागृती व खडा पहारा योजनेसाठी नाव नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे बेळगावसह परिसरातून शेकडो धारकरी सभेला उपस्थित राहतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केला.
बऱ्याच दिवसांनंतर भिडे गुरुजींची जाहीर सभा होणार असल्याने या सभेच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी बैठक झाली. बैठकीत विभाग प्रमुखांना कामांच्या जबाबदारीची विभागणी केली. भिडे गुऊजींच्या मार्गदर्शनाखाली 32 मण सुवर्ण सिंहासन उभारले जाणार आहे. यासाठी कर्तव्य निधीची आवश्यकता असून गावोगावी जागृती केली जाणार आहे. सुवर्ण सिंहासनाच्या देखरेखीसाठी खडा पहारा योजना सुरू करण्यात आली असून त्यासाठी कार्यकर्त्यांची नावनोंदणी केली जात आहे. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, आर आय. पाटील, तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.