SambhajiRaje Kolhapur Breaking News : प्रतापगडाच्या पायथ्या शेजारी असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीभोवती अतिक्रमण हटवल्यानंतर राज्यभरातील गडावरील असणारे अतिक्रमण हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. याच पार्श्वभूमिवर गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत संभाजीराजे छत्रपती भूमिका मांडणार आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाची ते पाहणी करणार आहेत. तसेच 4 डिसेंबर रोजी विशाळगड दौऱ्या दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणाची पाहणी करून त्यानंतर 5 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासोबत आढावा बैठक घेणार असल्य़ाची माहिती समोर आली आहे.
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. गड किल्ल्यांवरील सतत ढासळणाऱ्या बुरूजाची दुरुस्ती व्हावी यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात. मागील काही दिवसापासून पन्हाळा, विशाळगडावरील बुरुज सातत्याने ढासळत आहे. याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच गड किल्ल्यांवरील होणारे अतिक्रमण याची माहिती घेऊन ठोस भूमिका मांडणार असण्याची माहिती समोर आली आहे.

