कोल्हापूर: ३ मे रोजी खासदार पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर माझी दिशा जाहीर करणार असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते. त्यानंतर सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. त्यावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका १२ मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार असे जाहीर केले आहे. येत्या १२ मे रोजी माझी भूमिका जाहीर करणार आहे. संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की! स्वतःचे अस्तित्व राज्यात निर्माण करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करू, असे जाहीरपाने सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करू असे म्हणाले आहेत. मात्र आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घरणार हे येत्या १२ मे रोजी कळणार आहे.