वार्ताहर /सांबरा
येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या सन 1996-97 सालच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी पंचवीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
स्नेहमेळाव्याची सुरुवात ग्रामदेवता श्री दुर्गामातेच्या पूजनाने करण्यात आली. सर्व माजी गुरुजनांचे जल्लोषी स्वागत करून व्यासपीठावर आणण्यात आले. मयत शिक्षक व विद्यार्थ्यांना एक मिनीट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षिका जयश्री माने होत्या.
सर्व आजी-माजी शिक्षकांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन, फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सैन्यदल, वायुदल व इतर सरकारी नोकरी बजावत असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचाही पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वजण एक दिवस शाळेतील जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. माजी शिक्षकांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळाव्यानिमित्त प्रथमच शाळेला विद्युतरोषणाई करण्यात आली होती. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ऍक्वागार्ड व स्टील टाकी देणगीदाखल देण्यात आली. शाळेच्या संरक्षक भिंतीचे रंगकाम करून देण्यात आले. कार्यक्रमास माजी शिक्षक देसाई, एस. एफ. मेहेत्री, सुगंधा किल्लेकर, मारुती चिंगळे, भोसले टीचर, चिगरे टीचर, कोकार सर, मेणसे सर, एसडीएमसी अध्यक्ष सचिन अष्टेकर, उपाध्यक्षा सुमन गिरमलसह सर्व सदस्य व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण डुमरकी व सविता यड्डी यांनी केले.