प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात पर्वरी येथील संदीप अर्जुन वझरकर (52, पर्वरी) याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पणजीत अटक केली आहे. त्याच्या विरोधात भादंसंच्या 406 व 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वझरकर याने 2022 विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस उमेदवारीवरुन पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
या प्रकरणाबाबत पर्वरी येथील पुरुषोत्तम अगरवाल यांनी सुरुवातीला म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. नंतर ही तक्रार एसआयटीकडे देण्यात आली. एसआयटीने या तक्रारीचे तपास काम करीत असताना संदीप वझरकर याला अटक केली असून आणखीनही काहीजणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे.
संशयित संदीप वझरकर आणि अविनाश नाईक यांनी 10 नोव्हेंबर 2018 ते 21 ऑगस्ट 2021 या कालावधीत सांगोल्डा बार्देश येथील सर्वे क्रमांक 21/31 या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून सदर जमिनीचे विक्रीपत्र संदीप वझरकर यानी आपल्या नावे केले होते. नंतर त्या विक्रीपत्राचे सर्व अधिकार पुरुषोत्तम अगरवाल व त्यांची पत्नी लक्ष्मी अगरवाल यांच्या नावे केले. त्या बदल्यात वझरकर यांनी 27 लाख रुपये घेतले होते.
जमिनीचे आपले विक्रीपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच पुरुषोत्तम अगरवाल यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. नंतर सदर तक्रार एसआयटीकडे देण्यात आली. पोलीस कसून तपासकाम करीत असून अनेकांचे धाबे दणाणले आहे.
आणखी एक तक्रार दाखल
जमीन घोटाळा प्रकरणात एसआयटीने आणखी एक तक्रार अज्ञात संशयिताच्या विरोधात नोंद केली आहे. भादंसं 419 व 420 कलमाखाली ही तक्रार नोंद केली आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या क्रिस्टी फर्नांडिस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. आजगाव येथील सर्वे क्रमांक 252/3 व 253/3 या जमिनीची कोणीतरी बोगस कागदपत्रे तयार केली असून या जमिनीचे आपण वारसदार असल्याचे संबंधीत अधिकाऱयांकडे दावा केला आहे. सदर जमीन ही आपल्या मालकीची असून त्यात घूसखोरी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एसआयटीने ही तक्रार नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.