विभुतवाडी येथे भिषण अपघात : मृत कोरेगाव तालुक्यातील
प्रतिनिधी/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे पंढरपूर-मल्हारपेठ हायवेवर झालेल्या भिषण अपघातात 3 जण ठार झाले. छोटा हत्ती-टेम्पो व बोअरवेल ट्रकमध्ये गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भिषण अपघातातील मृतांत सुलतानवाडी (ता. कोरेगाव जि.सातारा) येथील तिघांचा समावेश आहे. कृषि अवजारांची वाहतूक करताना काळाने झडप घातली.
आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे मायणी रस्त्याला असलेल्या वळणावर गुरूवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास शेतकरी कृषि यंत्र कोरेगाव, चैतन्य मशिनरी पुसेगाव असा फलक असलेली कृषि अवजारे विक्री करणारा छोटा टेम्पो (एमएच 05 बीएच 3414) आणि बोअरवेल वाहतूक करणाऱया ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भिषण होती की बोअरवेलचा ट्रक पलटी झाला तर छोट्य़ा टेप्पोचा पुढील भाग उध्दवस्त झाला. या छोटय़ा टेम्पोत बसलेले गणेश फडतरे, महेश फडतरे यांचा मायणी व आटपाडी येथे दवाखान्यात नेत असताना मृत्यु झाला. तर तिसरा जखमी निशांत फडतरे याचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला.
मध्यरात्री अपघाताची माहिती मिळताच विभुतवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवुन दरवाजा तोडुन आत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने मायणी व आटपाडी येथे उपचारासाठी हलविले. परंतु दुर्दैवाने तिघांचा मृत्यु झाला. मयत तिघेही अवजारे विक्री करून घराकडे परतत असताना काळाने झडप घातली. दरम्यान, अपघातानंतर छोटा टेम्पो या गाडीतील रोख रक्कम 32 हजार 500 ही जशीच्या तशी विभुतवाडी ग्रामस्थांनी सुरक्षित सांभाळली व शुक्रवारी नातेवाईकांकडे सुपुर्द करत माणुसकीचे दर्शन घडविले.
धोकायदायक वळणाने घात
विभूतवाडी ते मायणी रस्त्यावर ओढय़ालगत असणाऱया तिघांचे बळी घेणाऱ्या वळणाने आत्तापर्यंत अनेकांचा घात केला आहे. यापूर्वी चार भिषण अपघात झाले आहेत. याशिवाय लहान-मोठे सातत्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी हे धोकादायक वळण हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यास अनेक वाहनधारकांचे प्राण वाचतील, अशी भावना विभुतवाडीकरांनी व्यक्त केली.