Tarun Bharat

विट्याच्या पृथ्वीला पदार्पणातच इंटरनॅशनल गोल्ड

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमधील पहिली मराठी विजेती : जॉर्डनमध्ये फडकवला तिरंगा : सर्वच्या सर्व प्रतिस्पर्धींवर थरारक मात

प्रतिनिधी/विटा

महाराष्ट्रातल्या विट्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या पृथ्वी बर्वेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणातच भारताचा तिरंगा खांद्यावर घेतला. इंटरनॅशनल टेबल टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने जॉर्डनच्या भूमीत भारतीय स्पर्धेकांच्या मनात राष्ट्रगान घुमवले. पृथ्वी स्पर्धेतली सर्वात लहान वयाची मुलगी ठरली. तिने एकूण एक स्पर्धींवर मात करत हे आंतरराष्ट्रीय यश खेचून आणलं आहे.

टेबल टेनिस मधील पॅरा चॅम्पियनशिप 2022 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वीने ही कमाल केली आहे. लिगपद्धतीत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत तिला खरी टक्कर मिळाली ती जर्मनीच्या ऑलिव्ह तिझियाना हिची. गत स्पर्धेची विजेती असल्याने तिच्या बाजूनेच साऱ्या प्रेक्षकांचा कल होता. ऑलिव्हच्या पहिल्या पॉईंट पासूनच टाळ्यांचा गजर होताना पृथ्वीवर प्रचंड ओझं ओढत चाललं होतं. पहिला सेट 11 बाय 9 ने जिंकताना तिनं ते ओझं जरा बाजूला केलं. दुसऱ्या सेटमध्ये ते पुन्हा वाढलं असलं तरी तिने 12 बाय 10 अशी निकराची झुंज देत सेट जिंकून प्रेक्षकांच्या मनासह ऑलिव्हवर जणू ताबाच घेतला. आणि तिसरा सेट 11 बाय 4 असा सहज खिश्यात घातला.

साऱ्या स्टेडियमच्या नजरा स्वतःकडे खेचून घेतलेल्या पृथ्वी बर्वे पुढे इजिप्तच्या अब्दील अजीजचे पुन्हा मोठे आव्हान असले तरी ते तिने दुणावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर निभावून नेले. 11-6, 11-5, 11-4 अशा सहजतेने पृथ्वी बर्वे अब्दीलवर हावी झाली.

लीग स्वरूपातल्या आंतराष्ट्रीय स्पर्ध्येत तिने एकूण एक सर्व प्रतिस्पर्धींवर मात केल्याने तिला विजेती ठरवण्यात आलं तर जर्मनीच्या ऑलिव्ह हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आलं.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिड शिवाय किंवा कोणत्याही नामांकानाशिवाय उतरलेल्या पृथ्वी बर्वे हिने थेट इंटरनॅशनल गोल्ड मिळवत केवळ भारत देशाचेच नाव उंचावले नाही तर पॅरा टेबल टेनिसचा इतिहास रचला आहे.

पृथ्वी गेली तीन वर्षे पुण्याच्या शारदा सेंटर येथे प्रशिक्षक दीप्ती चाफेकर आणि सुरेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे. फेब्रुवारी 2020 आणि 2021 च्या राष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वीने क्लास नाईन गटात रौप्य पदक पटकावलंय.
पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये शिकणाऱ्या पृथ्वीने सातारा येथे ललित सातघरे यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे.

स्पर्धेतील सर्वात कमी वयाच्या पृथ्वीने मिळवलेल्या यशाचे देशभरातून कौतुक होत असून ती विट्याचे ज्येष्ठ सेंद्रिय शेतीतज्ञ जयंत तथा बाबा बर्वे यांची नात तर नेचर केअर फर्टिलायझर्सचे जयदेव बर्वे व कामाक्षी बर्वे यांची ती कन्या आहे.

राज्य असोसिएशनचे अध्यक्ष राजीव बोडस, स्मिता बोडस, फर्ग्युसनचे मुख्याध्यापक डॉ. रविंद्रसिंग परदेशी, उप मुख्याध्यापक नारायण कुलकर्णी यांच्यासह जागृती महाजनी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Advertisements

Related Stories

भारतीय युवा बास्केटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सांगली : पेठमधील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Abhijeet Shinde

ओसाका, सॅसनोव्हिच दुसऱया फेरीत

Patil_p

पुजारा-वासवदाची मॅरेथॉन खेळी

tarunbharat

इंग्लंड-द. आफ्रिका चौथी कसोटी उद्यापासून

Patil_p

एजाझ पटेलच्या ‘त्या’ शर्टचा लिलाव

Patil_p
error: Content is protected !!