प्रतिनिधी/मिरज
तीन वर्षांपूर्वी झालेल्या कारवाईत जप्त केलेला सुमारे २५ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी जाळून नष्ट करण्यात आला. मिरज ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. गुटका कारवाई प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर गुटख्याचा साठा जाळून जमिनीत पुरण्यात आल्याचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी सांगितले.
डिसेंबर 2020 रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी मिरखेलकर यांनी तीन ठिकाणी कारवाई करून गुटखा व अवैध पान मसाला सुगंधी तंबाखू यांचा साठा जप्त केला होता. या तीन गुन्ह्यात सुमारे 25 लाख 36 हजार 156 रुपये किमतीचा आरएमडी गुटखा, रत्ना सुगंधी तंबाखू, अवैध विमल पान मसाला जप्त केला होता. हा साठा न्यायालयाच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासन ग्रामीण अधिकारी श्रीमती फावडे तसेच दोन पंच पत्रकार यांच्या उपस्थितीत ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी नष्ट करण्याची कारवाई केली आहे.