जत/प्रतिनिधी
जत पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याला माहिती सांगता न आल्याने संतापलेल्या महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला असून या घटनेची जोरदार चर्चा महसूल विभागात रंगली होती. नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना दिली. या घटनेने या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, माहिती न सांगता आल्यानंतर मारहाण करण्याचा नवा पायंडा या वरिष्ठ अधिकाऱ्याने जत तालुक्यात पाडल्याची खुमासदार चर्चा महसूल विभागासह अनेक विभागात रंगली होती. याबाबत कंत्राटी कर्मचाऱ्याने भीती पोटी वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात उघड उघड कुठेही लेखी तक्रार केलेली नाही.
जत तालुक्यात महसूल विभाग अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या आमसभेत नागरिकांनी असंख्य तक्रारीचा पाढाच मांडला होता. शिवाय, या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर ही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. शिवाय, या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तालुक्यातून महसूल विषयी समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांशी गैरवर्तन अथवा दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
यानंतर आज पुरवठा विभागाचे अधिकारी आपल्या वैयक्तिक कामासाठी रजेवर गेलेले असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. पुरवठा विभागाशी संबंधित विषयाची माहिती मागितली. त्या कर्मचाऱ्याला विषयाची अधिकची माहिती नसल्याने त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती देता आली नाही. मात्र, माहिती देता येत नसल्याचे कारण पुढे करत वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली.
मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्या विरोधात एक भ्र शब्द तोंडातून न काढता वरिष्ठांनी केलेल्या मारहाणीला उत्तर दिले नाही. शिवाय, याची कुठे तक्रार ही केली नाही. मात्र, या मारहाणीची महसूल विभागात जोरदार चर्चा रंगली असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.