सभापती रमेश तवडकर यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
सांगे मतदारसंघाला सुभाष फळदेसाई यांच्या रूपाने धडाडीचे नेतृत्व लाभल्याचे गौरवोद्गार सभापती रमेश तवडकर यांनी काढले. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा शनिवार दि. 20 रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सभापती रमेश तवडकर बोलत होते.
मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगे भाजप मंडळ कार्यालयाचे उद्घाटन सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगे भाजप मंडळ अध्यक्ष तसेच मंडळाचे इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना सभापती रमेश तवडकर म्हणाले की, 2012 ते 2017 या कालाधीत सुभाष फळदेसाई हे सांगेचे आमदार होते तर आपण सरकारात मंत्री होतो. त्यावेळी सांगे व काणकोणसाठी विकासाच्या अनेक योजना आखल्या होत्या. त्यातील काही मार्गी लागल्या. उर्वरित योजना यावेळी पुढे नेण्यात येतील. आज आपण सभापती तर सुभाष फळदेसाई मंत्री असल्याने विकासाला नक्कीच चालना मिळेल.
सुभाष फळदेसाई यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. सांगेचा विकास साध्य करण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो त्याच बरोबर त्यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो असे सभापती श्री. तवडकर म्हणाले.
यावेळी केपेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांचे मित्र अल्टन डिकॉस्ता आवर्जुन उपस्थित होते. तसेच सांगे मतदारसंघातील विविध पंचायतीचे पंच सदस्य, नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.