मिरजेत मटण मार्केटच्या वादातून दोन गटात तुफान राडा
भूमी पुजनालाच वादाची ठणगी, दगड, विटा, काठ्या आणि हत्यारांचा वापर, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, एक जण ताब्यात
मिरज (सांगली)
शहरातील प्रस्तावित असलेल्या मटन मार्केटच्या बांधकामाला सोमवारी सकाळी सुरुवात होताच मटन मार्केटमध्ये मिळणारे गाळे आणि मालकीची जागा या संदर्भात दोन गटात वादाची ठिणगी पेटली. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर दोन गटात दगड, काठ्या, विटा आणि हत्यारे घेऊन तुफान राडेबाजी झाली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राडेबाजांवर सौंम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
अधिक वाचा- मणेराजूरीनजीक वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो उलटला
गेल्या शंभर वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शहरातील मटन मार्केटच्या नूतनीकरणासाठी ६७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सोमवारी भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते मटन मार्केट कामाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी या मार्केटमध्ये मिळणारे गाळे आणि मालकी हक्काची जागा या संदर्भात दोन गटांमध्ये वादावादी सुरू होती. उद्घाटनापूर्वी हा वाद आमदार सुरेश खाडे यांच्या केबिन पर्यंत पोहोचला होता. तेथे दोन्ही गटाची समजत काढल्यानंतर अखेर भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊन लगेचच कामाला सुरुवात झाली. मटन विक्रेते आणि मासे विक्रेते यांची वेगवेगळी दुकाने आहेत. सुरुवातीला बांधकाम मजूर जीर्ण झालेल्या दुकानाची भिंत पाडत असताना मासे विक्रेते आणि मटन विक्रेत्यांचे दोन गट एकमेकांसमोर आले. मालकी हक्काची जागा आणि मटन मार्केटमध्ये आम्हालाच गाळा मिळाला पाहिजे म्हणून दोन गटात वादावादी सुरू झाली. वादावादीचे रूपांतर तुफान राडेबाजीत झाले. यावेळी काही तरुणांनी दगड विटा घेऊन बांधकाम मजुरांना ही मारहाण करून हाकलून लावले. यावरून पुन्हा जोरात वाद सुरू झाल्याने दोन गट एकमेकांवर तुटून पडले. दिसेल ते हत्यार, काट्या, लोखंडी रॉड, दगडे, विटा घेऊन तुफान मारामारी सुरू झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
मारामारीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सौम्य लाटीचार्ज करत गर्दीला पांगवले. पोलिसांची गाडी येताच मारामारी करणारे तरुण परिसरातून पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मटन मार्केटमध्ये मिळणाऱ्या गाड्या संदर्भात वाद असल्याने ही मारामारी झाल्याचे घटनास्थळी सांगण्यात येत होते. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे