सिध्देश्वर मंदिरात मानाच्या नारळाचा आणि कोथिंबिर पेंडीचा लिलाव
सांगली प्रतिनिधी
नारळाची किंमत देशाच्या बाजारात सरासरी प्रतिनग १५ ते 20 रुपयापर्यंत आहे.. मात्र ग्रामदैवताच्या धार्मिक उत्सवास मानाचा म्हणून पुजलेल्या एका नारळाला चक्क सव्वा लाख रुपये किंमत आली.. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात दरवर्षी पारायण सोहळा होतो… या सोहळ्याच्या समारोपाला दूध पुरण पोळीचा प्रसाद असतो… सुमारे पाच हजाराहुन अधिक लोकांना तृप्तीचा ढेकर येईपर्यंत हा प्रसाद मिळतो… त्यासाठी गावातून अनेक दाते सहभागी होतात.. शिवाय सिध्देश्वर मंदिरातच गावातील महिला पुरण पोळ्या बनवतात.. रात्रभर अखंडपणे हे काम सुरु असते.. सुमारे अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात पारायण आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग लोकांचा असतो.
महाप्रसादानंतर उरलेल्या साहित्याचा अगदी भक्तीपुर्ण वातावरणात लिलाव केला जातो.. श्रध्देपोटी या लिलावात अनेकजण सहभागी होतात.. एका एका वस्तूच्या खरेदीसाठी कमालीची चढाओढ लागते.. या लिलावातून मिळालेला पैसा मंदिराच्या विकासासाठी वापरला जातो.. यंदाच्या लिलावात मानाच्या नारळाने लाखाचे उड्डाण मारली आहे.. अरविंद पवार यांनी हा नारळ सव्वा लाख रुपयांना खरेदी केला… तर कोथिंबीरच्या एका पेंडीचा दर ८५०१ रुपयांवर पोहचला… सचिन शिंदे यांनी कोथिंबीर खरेदी केली.. अगदी पसाभर शिल्लक राहिलेेल्या पदार्थांना हजारो रुपयांची किंमत या लिलावात मिळाली.
जालिंदर पवार यांनी साडे नऊ हजार रुपयांना गहु आणि तांदूळ नऊ हजार रुपयांना खरेदी केले. गहु पिठाला साडे सात हजार रुपये मिळाले. बापूसाहेब सांभारे यांनी त्याची खरेदी केली. हरभरा डाळ विठ्ठल चौगुले यांनी सात हजार नऊशे रुपयांना खरेदी केली.. मसाल्याचा सौदा २९०१ रुपयांना रघुनाथ आंबी यांनी खरेदी केली.. सुटे नारळ २२०० रुपयांना पुंडलीक चौगुले यांनी, चटणी ८३०० रुपयांना गजानन पाटील यांनी, कापडी पडदे १९०१ रुपयांना संजय शिंदे यांनी, खाद्य तेल व मोकळे डबे आनंदा शिंदे यांनी १३ हजार १०० रुपयांना खरेदी केले. गव्हाचा कोंडा २३०१ रुपयांंना गणपती चव्हाण यांनी, भाजीपाला बाजीराव यादव यांनी ११०१ रुपयांना, ज्वारी मारुती आंबी यांनी ६३०० रुपयांना, द्रोण पत्रावळी संपत पाटील यांनी ४६०० रुपयांना, कळकाच्या पाट्या प्रकाश पवार यांनी ३००० रुपयांना, गुळ सुनिल आंबी यांनी ७१०० रुपयांना खरेदी केला.
सिध्देश्वर मंदिराचे प्रमुख गजानन पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत लिलाव प्रक्रीया झाली.. प्रत्येक घटकाच्या खरेदीसाठी कमालीची चढाओढ होती.