पालकमंत्री सुरेश खाडेंचा जिल्हा पोलिस यंत्रणेला इशारा
मिरज प्रतिनिधी
सांगली जिह्यात पुन्हा खुनांचे सत्र जोरात सुरु झाले आहे. घरफोडय़ा, मोटारसायकल, मोबाईल चोऱया पाचवीला पुजल्या आहेत. मिरज शहरासह ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमाने फोफावला आहे. जिल्हा पोलिसांसाठी हे अशोभनीय आहे. याबाबत पोलिस अधिक्षकांना योग्य ते आदेश देऊ. दुर्लक्ष झाल्यास खासदार-सर्व आमदारांसह गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे कामगारमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षात जिह्यातील गुन्हेगारीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी ठरत असली तरी, वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याकडे पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. जिह्यातील खुन सत्रामुळे हे अधोरेखित होते. याबाबत सर्वत्र आवाज उठविला जातो. पण त्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही, असे म्हणत पोलिसांच्या कामकाजावर पालकमंत्री खाडे यांनी नाराजी व्यक्त केली. जनतेची त्यांना काळजी राहिली नाही. त्याचे कामकाज अडीच वर्षात निष्क्रिय ठरल्याचे ते म्हणाले.
मिरज विधानसभा मतदारसंघात तर अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहे. घरफोडय़ा, मोटारसायकल आणि मोबाईल चोऱया नित्याचे प्रकार घडत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात दारुचे अड्डे, मटका व्यवसाय जोमाने सुरू असताना पोलिस ठाण्यांचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. हे जिल्हा पोलिस यंत्रणेला अशोभनीय आहे. याबाबत लोकप्रतिनिधींकडून अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण, त्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही. खासदार संजयकाका पाटील यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याची तात्काळ दुरूस्ती करावी, अन्यथा खासदार आणि जिह्यातील सर्व आमदांरासमवेत गृहमंत्र्यांना अहवाल देणार असल्याचे पालकमंत्री खाडे म्हणाले.
वाढत्या अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास येते. पण, अशा अवैध व्यवसायांना आळा घालणे पोलिस यंत्रणेला शक्य झाले नाही. शहरात मटका व्यवसाय जोमाने सुरू आहे. याशिवाय जुगार अड्डे आणि अंमली पदार्थ याची विक्री होत असल्याचे कारवाईवरुन दिसून येते. यास आळा बसला पाहिजे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांना पालकमंत्री म्हणून या गोष्टी गांभीर्याने घेण्यासाठी सुचित करु. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास गृहमंत्र्यांकडे रितसर तक्रार नोंदविली जाईल, असा इशाराही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी दिला.