20 लाखांचे हस्तीदंत जप्त : चौघांना अटक : अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांची माहिती
कवठेमहांकाळ / जत
कवठेमहंकाळ तालुक्यातील दंडोबा परिसरात 20 लाख रुपये रकमेचे लपवून ठेवलेले हस्तीदंत कवठेमहंकाळ पोलिसांनी छापा टाकून पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राहूल भीमराव रायकर (28, रा. संकपाळ गल्ली,कसबा बावडा, कोल्हापूर), बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (30, विजयनगर, कोल्हापूर), कासिम शमशुद्दीन काझी (20, रा. खाजा वस्ती, मिरज) व हणमंत लक्ष्मण वाघमोडे (39, रा. लोणारवाडी, ता. कवठे महांकाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जत येथे पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा : आर्थिक कारणातून मारहाण, सासरे जावई जखमी
पोलीस नाईक चंद्रसिंग साबळे यांना खास बातमी दाराकडून हस्तीदंताची खरेदी विक्रीबाबत माहिती मिळाली होती. डी. बी. पथकाचे प्रमुख अमिरशा फकीर हे सर्व बाबींवर नजर ठेवून होते. खरशिंग गावानजीक दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकून आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. सोमवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या चार आरोपींकडून 20 लाखांचे दोन हस्तीदंत, 40 हजार रूपयांच्या दोन दुचाकी असा एकूण 20 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली असली तरी आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, डी. बी.पथकाचे अमिरशा फकीर, पोलीस नाईक चंद्रसिंग साबळे, पोलीस फौजदार विजय घोलप, हवालदार केरबा चव्हाण,पोलीस कॉनस्टेबल सिद्धेश्वर कुंभार यांनी केली आहे. पुढील तपास डी.बी.पथकाचे प्रमुख अमिरशा फकीर करीत आहेत.
कसून चौकशी करणार
अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी याप्रकरणी कर्नाटक, कोल्हापूर या भागात देखील पोलीस पथक पाठवून कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच आरोपीवर वन्यजीव कायद्यांतर्गत कठोर कारवाई होईल.