२१ हजार सीड बॉलची निसर्गात उधळण : यंदा पुन्हा बनवणार ४ हजार सीड बॉल
सांगली/प्रतिनिधी
कोरोनामुळे नागरिकांना निसर्गातीलऑक्सिजनचे महत्त्व पटले. वातावरणात नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्याचे संवर्धन महत्वाचे आहे. इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी गेली सहा वर्षे प्रयत्न केले जात आहेत. तब्बल २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. या ही पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या आठवड्यात चार हजार सीड बॉल बनविण्यात येणार आहेत. मुक्तांगणने पर्यावरणप्रेमींमध्ये आदर्श निर्माण केला आहे.
इस्लामपुरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात सहा वर्षाच्या आतील मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.
पाच जूनला सर्वत्र पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो.या निमित्ताने सामजिक बांधिलकी म्हणून सीड बॉल बनविण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले.चिखलाचे गोळे करून त्यात विविध वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच , जांभूळ व इतर फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या बिया घातल्या जातात. विद्यार्थी आपल्या हाताने गोल आकार सीड बॉल बनवतात. गेल्या काही दिवसांपासून मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात हा उपक्रम सुरू आहे.
बऱ्याचदा फळे खाऊन झाली की बिया फेकल्या जातात. त्या बिया शाळेच्या मुलांकडून व पालकांच्या माध्यमातून जमा केल्या जातात. या बिया संकलित करून सीड बॉल बनविले जात आहेत. बनवलेले सीड बॉल विविध डोंगरावर फेकण्यात येत आहेत. चिंचोके, जांभूळ, पपई , फणस, बहावा, गुलमोहर, रानटी बाभूळ आदी सीड आणले हाते. लहान मुले, पालकांसह माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग नोंदवत सीड बॉल बनविण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला.
गेल्या पाच वर्षात २१ हजार सीड बॉल बनविण्यात आले होते. ते पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या डोंगरावर फेकण्यात आले आहेत. सरासरी ७० टक्के झाडांचे बीज रोपण झाले आहे. त्यामुळे सुमारे १५ हजार झाडे जगली आहेत अशी माहिती मुक्तांगणच्या अध्यक्षा सरोजनी मोहिते यांनी दिली. त्या म्हणाल्या, यंदा ४ हजार सीड बॉल बनवण्यात येत आहेत.
वाळलेले सीड बॉल निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान मुलांच्या मार्फत टाकण्यात येणार आहेत. हे बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल अशी ही संकल्पना आहे.