उटगी/वार्ताहर
जत तालुक्यातील जत-चढचण राज्यमार्गावरील उटगी ते सोन्याळ रस्त्यावरील गणपती मंदिर जवळ दोन दुचाकी गाड्यांचा अपघात झाला. दोन दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले असून एकजण सोन्याळ तर दुसरा निगडी बु. चा असल्याचे समजते. तर या अपघातात दोन्ही दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान, दोन्ही दुचाकीधारक सोन्याळ ते उटगीकडे जात होते. एक दुचाकीस्वार धारक गणपती मंदिराच्या जवळ असणाऱ्या आपल्या घराकडे जाण्यासाठी वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही गाड्यांची टक्कर झाली. यामध्ये दोन्ही गाड्यानी पेट घेतला. काही क्षणातच दोन्ही गाड्या जाळून खाक झाल्या. दैव बलवत्तर म्हणून दोन्ही दुचाकीस्वारांचे प्राण वाचले आहेत. या विचित्र अपघातात दोनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच उटगी सोन्याळ परिसरातील नागरिकांनी, राज्यमार्गावरील वाटसरूनी गर्दी केली होती.